जिद्द, चिकाटी अन् सांघिक खेळाची कमाल! बारामतीतील अनेकान्त स्कूलच्या मुलींनी राज्यस्तरीय हॉकीत पटकावले उपविजेतेपद!
बुलढाण्यात आठ विभागांतील संघांना दिली कडवी झुंज; १४ वर्षांखालील मुलींच्या संघाची उल्लेखनीय कामगिरी

जिद्द, चिकाटी अन् सांघिक खेळाची कमाल! बारामतीतील अनेकान्त स्कूलच्या मुलींनी राज्यस्तरीय हॉकीत पटकावले उपविजेतेपद!
बुलढाण्यात आठ विभागांतील संघांना दिली कडवी झुंज; १४ वर्षांखालील मुलींच्या संघाची उल्लेखनीय कामगिरी
बारामती वार्तापत्र
बुलढाणा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत अनेकान्त इंग्लिश मीडियम स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. राज्यभरातील आठ विभागांतील नामांकित संघांना कडवी झुंज देत अनेकान्तच्या मुलींनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आणि उपविजेतेपदावर आपले नाव कोरले. या यशामुळे शाळेसह संपूर्ण परिसरातून विजयी खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
खेळाडूंची जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि उत्तम सांघिक भावना या यशामागील प्रमुख वैशिष्ट्ये ठरली. संपूर्ण स्पर्धेत अनेकान्तच्या संघाने उत्कृष्ट ताळमेळ राखत प्रतिस्पर्धी संघांसमोर कडवे आव्हान उभे केले.
संघाच्या बचावफळीत शरयु गुळूमकर, माही बेलदार आणि अनन्या भगत यांनी भक्कम बचाव करत प्रतिस्पर्ध्यांचे हल्ले परतवून लावले. मधल्या फळीत संख्या मोरे, साक्षी नाळे आणि पूर्वी रणदिवे यांनी खेळावर नियंत्रण ठेवत संघाची बाजू मजबूत केली. तर आघाडीच्या फळीत अनुष्का झगडे, ईश्वरी दळवी, शरयू कोळसे, श्रेया बिचुकले, आदिती बाभळे, स्वरा कानडे, रिद्धी जगताप आणि पूर्वा बोराडे यांनी वेगवान चढाया करत प्रतिस्पर्धी संघांना बॅकफूटवर ठेवले.
या स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या जोरावर अनेकान्त इंग्लिश मीडियम स्कूलच्या कु. साक्षी महेंद्र नाळे, कु. शरयू अतुल गुळुमकर आणि कु. माही तात्यासाहेब बेलदार या तीन खेळाडूंची १४ वर्षांखालील महाराष्ट्र राज्य हॉकी संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे शाळेच्या यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून बारामतीच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.
या यशस्वी वाटचालीत शाळेचे क्रीडा शिक्षक राहुल लोखंडे सर यांचे मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे, प्रोत्साहनामुळे आणि अथक प्रयत्नांमुळे संघाला राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करता आली.
या यशाबद्दल अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. चंद्रगुप्त शाह (वाघोलीकर), सचिव श्री. मिलिंद शाह (वाघोलीकर), शाळेचे चेअरमन श्री. चंद्रवदन शहा (मुंबईकर), व्यवस्थापक श्री. धवल शाह (वाघोलीकर), शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच प्राचार्या श्रीमती प्रणाली वडेर यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच आगामी स्पर्धा आणि पुढील क्रीडा वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
अनेकान्तच्या मुलींच्या या यशस्वी कामगिरीने बारामतीच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढवला असून, महाराष्ट्र संघात निवड झालेल्या तीन खेळाडूंकडून आगामी स्पर्धांमध्येही उत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.






