राजकीय

“सुनेत्रा पवारांच्या समर्थनार्थ बारामतीत राष्ट्रवादीचा दंड थोपटला! रोहित पवारांच्या वक्तव्याविरोधात भिगवण चौकात जोरदार शक्तिप्रदर्शन!”

शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी रस्त्यावर; घोषणाबाजी करत रोहित पवारांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध!

“सुनेत्रा पवारांच्या समर्थनार्थ बारामतीत राष्ट्रवादीचा दंड थोपटला! रोहित पवारांच्या वक्तव्याविरोधात भिगवण चौकात जोरदार शक्तिप्रदर्शन!”

शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी रस्त्यावर; घोषणाबाजी करत रोहित पवारांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध!

बारामती वार्तापत्र

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद बारामतीत उमटले आहेत. या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, त्याचा निषेध करण्यासाठी बारामती शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवार (दि. २७ नोव्हेंबर) रोजी भिगवण चौकात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून रोहित पवारांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा संदेश दिला.

पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी केलेल्या विधानामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्या कामकाजावर आणि कार्यक्षमतेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याप्रमाणे सध्याच्या पालकमंत्र्यांना काम करता येत नसल्याचे विधानही त्यांनी केले होते. या वक्तव्यामुळे अजितदादा पवार गटातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली.

याच पार्श्वभूमीवर बारामती शहर आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत भिगवण चौकात निषेध आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत रोहित पवार यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. सुनेत्रा पवार यांच्या कामकाजावर करण्यात आलेल्या टीकेविरोधात पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने एकजूट दाखवत आपली भूमिका स्पष्ट केली.

या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे, नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष श्वेता नाळे, बारामती दूध संघाचे चेअरमन किशोर फरतडे, गटनेते संजय संघवी, नगरसेविका अनुप्रिता डांगे, भारती शेळके, सारिका वाघमारे, प्रतिभा खरात, समीर चव्हाण, प्रवीण माने, नवनाथ मलगुंडे, विष्णुपंत चौधर, अविनाश बांदल, अभिजित जाधव, प्रसाद खारतोडे, अमर धुमाळ, विशाल हिंगणे, मंगला कर्वे, गोरख पारसे, सुनील सस्ते, सुरज सातव, गणेश जोजारे, अमोल कावळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पागळे, युवक अध्यक्ष अभिजित घाडगे आणि जनसंपर्क अधिकारी सुरज देवकाते यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, कार्यकारिणी सदस्य तसेच आजी-माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारामतीत पुन्हा गटबाजीची चर्चा!

दरम्यान, बारामती ही अजितदादा पवार यांची राजकीय कर्मभूमी असल्याने येथील राजकीय घडामोडींना विशेष महत्त्व आहे. रोहित पवार यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ झालेल्या या आंदोलनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांमधील राजकीय दरी पुन्हा चर्चेत आली आहे. सुनेत्रा पवार यांच्या कामकाजावरून सुरू झालेला हा वाद आता केवळ विधानापुरता मर्यादित न राहता राजकीय संघर्षाचे स्वरूप घेत असल्याचे चित्र दिसत आहे.

आगामी काळात या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो आणि रोहित पवार या निषेधावर काय भूमिका मांडतात, याकडे आता बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Back to top button