बारामतीच्या २४ नगरसेवकांची मुंबईत पहिली धडक यशस्वी! खासदार पार्थ पवारांची भेट; तातडीने सर्वसाधारण सभा घेण्याच्या सूचना!
नगरपरिषदेतील कथित चुकीच्या कामांचा पाढा वाचला; नगरसेवकांना विश्वासात घेऊनच कारभार करण्याचे निर्देश? आता सुनेत्रावहिनी पवारांच्या भेटीकडे लक्ष!

बारामतीच्या २४ नगरसेवकांची मुंबईत पहिली धडक यशस्वी! खासदार पार्थ पवारांची भेट; तातडीने सर्वसाधारण सभा घेण्याच्या सूचना!
नगरपरिषदेतील कथित चुकीच्या कामांचा पाढा वाचला; नगरसेवकांना विश्वासात घेऊनच कारभार करण्याचे निर्देश? आता सुनेत्रावहिनी पवारांच्या भेटीकडे लक्ष!
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषदेतील कामकाजावरून सुरू झालेला नाराजीचा उद्रेक आता थेट मुंबईपर्यंत पोहोचला आहे. नगरपरिषदेच्या कारभारावर आक्षेप घेत सुमारे २४ नगरसेवकांनी स्वाक्षऱ्या केलेले लेखी निवेदन घेऊन मुंबई गाठले. या शिष्टमंडळाने राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नगरपरिषदेतील विविध प्रश्नांचा पाढाच वाचला. त्यामुळे नगरसेवकांच्या मुंबई दौऱ्याला आता महत्त्वपूर्ण यश मिळाल्याचे चित्र आहे.
पार्थ पवारांकडून तातडीने दखल!
नगरसेवकांनी खासदार पार्थ पवार यांच्याकडे सर्वसाधारण सभा वेळेवर होत नसल्याची, स्थायी समितीच्या बैठका न झाल्याची, तसेच नगरपरिषदेच्या कामकाजातील विविध त्रुटी आणि कथित चुकीच्या कामांबाबत सविस्तर भूमिका मांडली. यावेळी २४ नगरसेवकांच्या सह्यांचे निवेदन त्यांना प्रत्यक्ष सादर करण्यात आले.
या प्रश्नांची दखल घेत खासदार पार्थ पवार यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने फोन करून सर्वसाधारण सभा आयोजित करण्याबाबत सूचना दिल्याची माहिती मिळत आहे. तसेच नगरसेवकांना विश्वासात घेऊन, त्यांच्या प्रश्नांना आणि विकासकामांच्या मागण्यांना प्राधान्य देऊन कामकाज केले पाहिजे, अशा स्पष्ट सूचना दिल्याचे समजते.
निवेदनातील प्रमुख मुद्दे पुन्हा ऐरणीवर!
- वर्षभरात केवळ दोनच सर्वसाधारण सभा झाल्याचा आक्षेप.
- एकही स्थायी समितीची बैठक न झाल्याची तक्रार.
- सुमारे ४० विषयांवर २४ नगरसेवकांच्या हरकती व सूचना.
- सभेचे दुरुस्त इतिवृत्त उपलब्ध करून न दिल्याचा आरोप.
- पाणीपुरवठा, रस्ते, गटारे, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न प्रलंबित.
- सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन पारदर्शक कारभार करण्याची मागणी.
आता सुनेत्रावहिनींच्या भेटीकडे संपूर्ण बारामतीचे लक्ष!
खासदार पार्थ पवार यांची भेट घेतल्यानंतर हे शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनाही निवेदन देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे बारामती नगरपरिषदेतील नाराजीचा हा विषय आता वरिष्ठ नेतृत्वाच्या दरबारात पोहोचला आहे.
आता खरा प्रश्न असा की, नगरसेवकांच्या निवेदनातील मुद्द्यांवर प्रत्यक्ष कारवाई होणार का? रखडलेल्या विकासकामांना गती मिळणार का? नगरपरिषदेचा कारभार पारदर्शक होणार का? आणि सर्वसाधारण सभा नियमित होऊन नगरसेवकांना त्यांचे प्रश्न मांडण्याची संधी मिळणार का?
२४ नगरसेवकांच्या या एकजुटीने बारामतीच्या राजकीय वर्तुळात नवा संदेश दिला असून, आता प्रशासन आणि सत्ताधारी नेतृत्व नेमकी काय भूमिका घेणार, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.
बारामतीच्या विकासासाठी एकजूट की नगरपरिषदेच्या कारभाराविरोधात नव्या संघर्षाची सुरुवात? येणारा काळच ठरवणार!






