राजकीय

बारामती नगरपरिषदेत राजकीय हालचालींना वेग! २४ नगरसेवकांचा मुंबईत मुक्काम; वरिष्ठ नेतृत्वाच्या भेटीची तयारी!

वर्षभरात केवळ दोनच सर्वसाधारण सभा; विकासकामे रखडल्याचा आरोप! सुनेत्रावहिनी पवार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास प्रधान सचिवांकडे नगरसेवक मांडणार प्रश्न!

बारामती नगरपरिषदेत राजकीय हालचालींना वेग! २४ नगरसेवकांचा मुंबईत मुक्काम; वरिष्ठ नेतृत्वाच्या भेटीची तयारी!

वर्षभरात केवळ दोनच सर्वसाधारण सभा; विकासकामे रखडल्याचा आरोप! सुनेत्रावहिनी पवार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास प्रधान सचिवांकडे नगरसेवक मांडणार प्रश्न!

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपरिषदेच्या कामकाजावरून आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभा नियमित होत नसल्याने विकासकामे आणि नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहत असल्याची नाराजी नगरसेवकांमध्ये वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर बारामतीतील तब्बल २४ नगरसेवकांनी एकत्र येत मुंबईत वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेण्याची तयारी केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

वर्षभरात केवळ दोन सभा; स्थायी समितीची बैठकही नाही!

नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री तथा बारामतीच्या लोकप्रतिनिधी सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यामध्ये वर्षभरात केवळ दोन सर्वसाधारण सभा झाल्याचे, तर स्थायी समितीची एकही बैठक झाली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा, रस्ते, गटार व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य, पथदिवे आणि वाहतूक यांसारखे अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबित असल्याचा दावा नगरसेवकांनी केला आहे. सभा नियमित होत नसल्यामुळे नागरिकांचे प्रश्न सभागृहात मांडण्याची संधी मिळत नसल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे.

४० विषयांवरील हरकती; दुरुस्त इतिवृत्ताचा वाद!

मागील सर्वसाधारण सभांमध्ये सुमारे ४० विषयांवर २४ नगरसेवकांनी हरकती, सूचना आणि महत्त्वपूर्ण दुरुस्त्या मांडल्या होत्या. मात्र, या दुरुस्त्या सभेच्या इतिवृत्तात योग्य प्रकारे समाविष्ट झाल्या नसल्याचा आक्षेप नगरसेवकांनी घेतला आहे.

तसेच सुधारित इतिवृत्त (प्रोसिडिंग) नगरसेवकांना उपलब्ध करून दिले नसल्याने सभेच्या कामकाजातील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

विवाह समारंभातील भेटीनंतर फोनाफोनी; रात्रीच मुंबईकडे कूच!

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका विवाह समारंभाच्या निमित्ताने बारामतीतील अनेक नगरसेवक एकत्र आले होते. याचवेळी नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत चर्चा झाली. त्यानंतर सुरू झालेल्या फोनाफोनीतून मुंबईत वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेण्याचे नियोजन झाल्याचे समजते.

गुरुवार (दि. २६ नोव्हेंबर) रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सुनेत्रावहिनी पवार यांची भेट घेण्याचे नियोजन असल्याची चर्चा आहे. तसेच नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांची भेट घेऊन नगरपरिषदेच्या कामकाजातील अडचणी मांडण्याचाही प्रयत्न होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

नगरसेवकांच्या सात प्रमुख मागण्या!

नगरसेवकांनी निवेदनातून पुढील मागण्या केल्या आहेत.

१. नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा तातडीने आयोजित करावी.

२. सर्वसाधारण सभा नियमित कालावधीत घ्याव्यात.

३. मागील सभांमधील हरकती आणि सूचनांची तपासणी करावी.

४. दुरुस्त केलेले इतिवृत्त नगरसेवकांना उपलब्ध करून द्यावे.

५. प्रलंबित विकासकामांना प्राधान्य द्यावे.

६. नगरसेवकांना नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी योग्य संधी द्यावी.

७. सभा घेण्यास झालेल्या विलंबाची कारणे तपासून प्रशासकीय कार्यवाही करावी.

मुंबईतील भेटीकडे बारामतीकरांचे लक्ष!

बारामती शहराच्या विकासाचा वेग कायम राहावा, नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावेत आणि नगरपरिषदेचे कामकाज नियमित व्हावे, अशी नगरसेवकांची भूमिका असल्याचे निवेदनातून स्पष्ट होते.

मात्र, २४ नगरसेवकांनी एकत्र येत थेट मुंबईत वरिष्ठ नेतृत्वाकडे धाव घेतल्याने बारामतीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमके काय घडणार? नगरविकास विभागाकडून कोणते निर्देश दिले जाणार? नगरसेवकांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळणार का? आणि नगरपरिषदेच्या कामकाजात बदल होणार का? याकडे संपूर्ण बारामतीचे लक्ष लागले आहे.

Back to top button