बारामतीत विकृत शिक्षकाला न्यायालयाचा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी २० वर्षांचा सश्रम कारावास!
गुरु-शिष्य नात्याला काळिमा!

बारामतीत विकृत शिक्षकाला न्यायालयाचा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी २० वर्षांचा सश्रम कारावास!
गुरु-शिष्य नात्याला काळिमा!
बारामती वार्तापत्र
शिक्षकासारख्या जबाबदार पदावर असताना अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाने कठोर निकाल दिला आहे. या प्रकरणातील आरोपी शिक्षकाला दोषी ठरवत न्यायालयाने २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून, ४५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. जिल्हा न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
सदर प्रकरणात आरोपी हा शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याने अल्पवयीन विद्यार्थिनीला विश्वासात घेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. या गंभीर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने पीडित बालिकेची साक्ष, पालकांची साक्ष, हॉटेलमधील नोंदी, घटनास्थळाचे पंचनामे, कपड्यांची जप्ती, वैद्यकीय कागदपत्रे तसेच तपासातील अन्य महत्त्वाचे पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले.
सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. डी. एस. शिंगाडे यांनी सात साक्षीदार तपासून न्यायालयात प्रभावी बाजू मांडली. त्यांना अॅड. योगेश लालकबी यांनी सहकार्य केले. तसेच तपास अधिकारी, यवत पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
या निकालामुळे बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये कायद्याची कठोर अंमलबजावणी होऊ शकते, असा ठोस संदेश समाजात गेला आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या न्यायाच्या हक्काचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.






