दुष्काळातही बारामतीचा चमत्कार! AI तंत्रज्ञानाने एकरी १२० टन ऊस; शरद पवारांच्या गोविंद बागेचा प्रयोग चर्चेत!
कमी पावसात अधिक उत्पादनाचा प्रयोग!

दुष्काळातही बारामतीचा चमत्कार! AI तंत्रज्ञानाने एकरी १२० टन ऊस; शरद पवारांच्या गोविंद बागेचा प्रयोग चर्चेत!
कमी पावसात अधिक उत्पादनाचा प्रयोग!
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्रातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती, पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याचे संकट निर्माण झाले असताना बारामतीतून शेती क्षेत्रासाठी आशादायी चित्र समोर आले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंद बागेत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी तब्बल १२० टन ऊस उत्पादन मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या १५ वर्षांपासून एकरी सरासरी ६० टनांच्या पुढे न गेलेले उत्पादन यंदा दुप्पट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात किती मोठी वाढ होऊ शकते, याचे उदाहरण गोविंद बागेतील या प्रयोगातून समोर आले आहे. माती, पाणी, हवामान आणि पिकांच्या गरजांचा शास्त्रीय अभ्यास करून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेती व्यवस्थापनाचे मॉडेल विकसित करण्यात आले. त्यानुसार पिकाला आवश्यक असलेले पाणी, खते आणि पीक संरक्षणाचे नियोजन करण्यात आले.
बारामतीतील एडीटी एआय ट्रेनिंग फाउंडेशन, अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभिनव प्रयोग राबविण्यात आला. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊस पिकाच्या वाढीवर लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार व्यवस्थापन करण्यात आले. त्यामुळे उत्पादनवाढीसोबतच शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासही मदत झाल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रयोगातील माहितीनुसार, एकरी खत खर्चात सुमारे १० हजार रुपये, तर पीक संरक्षणावरील खर्चात ५ हजार ३३२ रुपयांची बचत झाली आहे. तसेच साखर उताऱ्यात सुधारणा आणि मातीच्या आरोग्यात सकारात्मक बदल झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. एकरी सरासरी २५ लाख लिटर पाण्याचा वापर झाल्याची माहितीही देण्यात आली आहे. पाण्याचे नियोजन, खतांचा संतुलित वापर आणि पीक संरक्षणाच्या योग्य पद्धती यामुळे शेती अधिक परिणामकारक करण्याचा प्रयत्न या प्रयोगातून करण्यात आला.
या अभिनव प्रयोगाची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. यावेळी आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून शेतीचे भविष्य कसे बदलू शकते, याचा आढावा घेण्यात आला. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादन आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, गोविंद बागेतील हा प्रयोग केवळ एका शेतीपुरता मर्यादित न राहता राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कृषी संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे आणि संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून अशा तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
दुष्काळ, पाणीटंचाई, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीसमोरील विविध आव्हानांच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील गोविंद बागेचा हा प्रयोग महत्त्वपूर्ण ठरत आहे. शेतीचे भविष्य आता केवळ पारंपरिक पद्धतींवर अवलंबून न राहता विज्ञान, संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापरावरही अवलंबून असेल, हेच या प्रयोगातून अधोरेखित झाले आहे.






