कृषी

दुधाला पाच रुपयांचा आधार द्या; पशुखाद्यालाही अनुदान द्या! बारामती दूध संघाची शासनाकडे मागणी; चारा डेपो सुरू करण्याचीही मागणी!

संकटात सापडलेल्या पशुपालक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा मिळतो का

दुधाला पाच रुपयांचा आधार द्या; पशुखाद्यालाही अनुदान द्या! बारामती दूध संघाची शासनाकडे मागणी; चारा डेपो सुरू करण्याचीही मागणी!

संकटात सापडलेल्या पशुपालक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा मिळतो का

बारामती वार्तापत्र 

दुष्काळसदृश परिस्थिती, पाणीटंचाई आणि पशुखाद्याच्या वाढत्या दरांमुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जनावरांचे संगोपन करायचे कसे आणि वाढता उत्पादन खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न दूध उत्पादकांसमोर उभा राहिला आहे.

या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर किमान ५ रुपये अनुदान द्यावे, तसेच पशुखाद्याच्या प्रत्येक पोत्यामागे २५ रुपये अनुदान द्यावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाने शासनाकडे केली आहे.

यंदा निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या गंभीर बनत आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणे, त्यांच्यासाठी पुरेसा चारा मिळवणे आणि वाढत्या पशुखाद्याच्या किमतींचा सामना करणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. दूध उत्पादनातून मिळणारे उत्पन्न आणि त्यासाठी होणारा खर्च यांचा ताळमेळ बसवताना दूध उत्पादकांची आर्थिक कोंडी होत आहे.

या संकटातून दूध उत्पादकांना बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी भूमिका दूध संघाने मांडली आहे. दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याबरोबरच पशुखाद्याच्या प्रत्येक पोत्यामागे २५ रुपये अनुदान देण्याची योजना सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

केवळ आर्थिक मदत देऊन प्रश्न सुटणार नाही, तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लावणे आवश्यक असल्याचे दूध संघाने म्हटले आहे. बारामती तालुक्यात जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच चारा टंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यात ठिकठिकाणी चारा डेपो सुरू करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या मागण्यांची माहिती दूध संघाचे अध्यक्ष किशोर फरतडे आणि उपाध्यक्ष पुरुषोत्तम गाढवे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शासनाने दूध उत्पादकांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेऊन प्रतिलिटर अनुदान, पशुखाद्य अनुदान आणि चारा-पाणी उपलब्धतेबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

आता शासन दूध उत्पादकांच्या या मागण्यांना किती लवकर प्रतिसाद देते आणि संकटात सापडलेल्या पशुपालक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा मिळतो का, याकडे बारामती तालुक्यातील दूध उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

Back to top button