कृषी

बारामतीत नाशिकच्या शेतकऱ्यांची आधुनिक कृषी शाळा! AI, ड्रोन, फळपीक तंत्रज्ञान अन् प्रक्रिया उद्योगांचे पाच दिवस धडे!

उत्पादन वाढविण्यापासून निर्यातीपर्यंत मार्गदर्शन!

बारामतीत नाशिकच्या शेतकऱ्यांची आधुनिक कृषी शाळा! AI, ड्रोन, फळपीक तंत्रज्ञान अन् प्रक्रिया उद्योगांचे पाच दिवस धडे!

उत्पादन वाढविण्यापासून निर्यातीपर्यंत मार्गदर्शन!

बारामती वार्तापत्र 

शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, पीक व्यवस्थापनातील नवे प्रयोग आणि शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्याचे तंत्र अवगत करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बारामतीत पाच दिवस आधुनिक शेतीचे धडे गिरवले. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नाशिक यांच्या वतीने तसेच एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला पाच दिवसीय राज्यांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

दि. १७ ते २१ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत झालेल्या या प्रशिक्षणात नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, नांदगाव आणि देवळा तालुक्यांतील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. फळपीक लागवड तंत्रज्ञान, काढणीपश्चात व्यवस्थापन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि विक्री व्यवस्थापन या विषयांवर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

AI, ड्रोन अन् स्मार्ट शेतीचे प्रत्यक्ष धडे!

प्रशिक्षणादरम्यान कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांनी केळी, कांदा, मका, डाळिंब व भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान, जमिनीचे आरोग्य, सेंद्रिय कर्ब, नैसर्गिक शेती निविष्ठा तसेच कीड व रोग व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मोबाईल ॲपद्वारे कीड-रोग निदान, ड्रोन तंत्रज्ञान, सेन्सर आधारित पाणी व्यवस्थापन, स्वयंचलित ठिबक सिंचन आणि हवामान अंदाजावर आधारित शेतीचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.

शेतीसोबत प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठेचेही मार्गदर्शन!

शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना, सामूहिक खरेदी-विक्री, निर्यात, ब्रँडिंग आणि विपणन व्यवस्थापन यांची माहिती देण्यात आली. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत उपलब्ध संधी, यंत्रसामग्री, पॅकिंग आणि अनुदानविषयक तरतुदी समजावून सांगण्यात आल्या. फळे व शेतमालापासून जॅम, जेली, ज्यूस, पावडर, पीठ, डाळी आणि तेल यांसारखी मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याच्या संधींचीही माहिती देण्यात आली.

राष्ट्रीय संस्थांसह यशस्वी प्रकल्पांना भेटी!

दि. १९ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांनी ICAR-NIASM, माळेगाव खुर्द येथे भेट देऊन हवामान बदल, दुष्काळ, वाढते तापमान, क्षारयुक्त जमीन आणि हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञानाची माहिती घेतली. केशर आंबा, न्यूसेलर मोसंबी, द्राक्षे आणि ड्रॅगन फ्रूट लागवडीचे तंत्र प्रत्यक्ष पाहिले.

तसेच दुग्धव्यवस्थापन उत्कृष्टता केंद्र, माळेगाव खुर्द येथे आधुनिक गोठा व्यवस्थापन, पशुखाद्य, दूध गुणवत्ता व दुग्धजन्य पदार्थांचे मूल्यवर्धन यांची माहिती घेण्यात आली. इंदापूर तालुका अँग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतमाल संकलन, प्रतवारी आणि सामूहिक विक्री व्यवस्थेची पाहणी करण्यात आली.

शेतीला जोडधंद्यांचीही जोड!

कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर गावठी कुक्कुटपालन, शेळीपालन, मेंढीपालन, गांडूळ खत निर्मिती, बायोफ्लॉक मत्स्यपालन, हायड्रोपोनिक्स आणि मधमाशीपालन या कृषीपूरक व्यवसायांची माहिती देण्यात आली. नर्सरी व्यवस्थापन, दर्जेदार रोपांची निर्मिती, प्रो-ट्रे, शेडनेट आणि पॉलीहाऊस तंत्रज्ञानाचेही मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षणाच्या अंतिम दिवशी उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त प्रगतिशील शेतकरी अशोक तावरे यांनी डाळिंब लागवड, पाणी व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग नियंत्रण आणि उत्पादन व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणाचा समारोप; शेतकऱ्यांनी व्यक्त केला समाधानाचा सूर!

समारोपप्रसंगी शेतकरी प्रतिनिधींनी प्रशिक्षणातील अनुभव सांगत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वतःच्या शेतीत वापर करण्याचा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत हे ज्ञान पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. सहभागी शेतकऱ्यांना प्रशिक्षण पूर्णत्वाची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

आत्मा, नाशिकचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. धीरज शिंदे, प्रशिक्षण समन्वयक सुभाष रणदिवे, गणेश शिंदे, विषय विशेषज्ञ संतोष गोडसे आणि इतर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक एस. टी. कर्नर यांनी प्रशिक्षणार्थींचे नियोजन व समन्वयाची जबाबदारी सांभाळली.

बारामतीच्या कृषी ज्ञानाचा नाशिकच्या शेतकऱ्यांना लाभ!

पाच दिवसांच्या या प्रशिक्षणातून आधुनिक फळपीक लागवड, AI आधारित शेती, हवामान अनुकूल तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन, निर्यात, दुग्धव्यवसाय आणि कृषीपूरक व्यवसायांचे प्रत्यक्ष ज्ञान शेतकऱ्यांना मिळाले. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादन खर्च कमी करणे, उत्पन्न वाढविणे आणि शेती अधिक फायदेशीर बनविण्याच्या दिशेने हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरले.

Back to top button