स्थानिक

बारामतीत पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! जनाई-शिरसाई योजना पेटली; देऊळगाव रसाळमध्ये आमरण उपोषण सुरू!

बारामतीत पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! जनाई-शिरसाई योजना पेटली; देऊळगाव रसाळमध्ये आमरण उपोषण सुरू!

पाईपलाईन भूमिगत व बंदिस्त करण्याची मागणी; अनधिकृत पाणी उपसा, गळती आणि अपूर्ण कामांवर शेतकरी आक्रमक!

बारामती वार्तापत्र 

जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या प्रलंबित मागण्यांवरून बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ येथील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. योजनेतील विविध त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे, या मागणीसाठी किसान संघर्ष समिती, देऊळगाव रसाळ यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, दि. २३ नोव्हेंबरपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांबाबत ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

पाईपलाईन भूमिगत आणि बंदिस्त करण्याची प्रमुख मागणी!

सुपे वितरण कुंडापासून देऊळगाव रसाळपर्यंतची संपूर्ण पाईपलाईन भूमिगत व बंदिस्त करण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. तसेच प्रस्तावित पाईपलाईनचा संपूर्ण नकाशा ग्रामस्थांना उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून योजनेच्या कामात पारदर्शकता राहील, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली आहे.

तलाव आणि बंधाऱ्यांचा सिंचन योजनेत समावेश करा!

गावातील उर्वरित तलाव आणि बंधाऱ्यांचाही जनाई-शिरसाई सिंचन योजनेत समावेश करावा. प्रलंबित जमीन संपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

पाईपलाईनमधील गळती अन् अनधिकृत पाणी उपशावर संताप!

पाईपलाईनमधील गळती आणि अनधिकृत पद्धतीने पाणी उपसा करण्यामुळे गावापर्यंत कमी दाबाने पाणी पोहोचत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अनधिकृत सायफनिंग करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

वाचणारे पाणी वंचित गावांच्या शेतीसाठी वापरा!

पाईपलाईन बंदिस्त केल्यामुळे वाचणारे पाणी पुणे महानगरपालिकेला देण्याऐवजी पाण्यापासून वंचित असलेल्या गावांतील तलाव आणि शेतीसाठी वापरण्यात यावे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे. संपूर्ण सिंचन योजना सौरऊर्जेवर चालवावी, अशी मागणीही आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

अपूर्ण कामे पूर्ण करा; रसाळवाडी तलावाचा समावेश करा!

कालव्यांची स्वच्छता करावी, पाईपलाईनमधील गळती बंद करावी आणि अपूर्ण असलेल्या लहान वितरिकाही पाईपलाईनमध्ये रूपांतरित कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच रसाळवाडी येथील तलावाचे नामकरण ‘रसाळवाडी महादेव मंदिर तलाव’ असे करून त्याचा सिंचन क्षेत्रात समावेश करावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

प्रशासन आता तरी दखल घेणार का?

जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, पाण्याचा अपव्यय थांबावा आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासन आणि संबंधित विभाग कोणता निर्णय घेतात, याकडे देऊळगाव रसाळसह परिसरातील गावांचे लक्ष लागले आहे.

पाण्यासाठी शेतकऱ्यांचा हा संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला असून, मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत बेमुदत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

Back to top button