स्थानिक

बारामती नगर परिषदेसमोर आंदोलनाचा ठिय्या! १७ मागण्यांसाठी बेमुदत चक्री धरणे सुरू; प्रशासनाकडून निर्णयाची प्रतीक्षा!

घरांचे नियमन, पाणी-ड्रेनेज अन् नागरी सुविधांचा प्रश्न!

बारामती नगर परिषदेसमोर आंदोलनाचा ठिय्या! १७ मागण्यांसाठी बेमुदत चक्री धरणे सुरू; प्रशासनाकडून निर्णयाची प्रतीक्षा!

घरांचे नियमन, पाणी-ड्रेनेज अन् नागरी सुविधांचा प्रश्न!

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरातील विविध नागरी समस्यांवरून बारामती नगर परिषदेसमोर बेमुदत चक्री धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मंगलदास तुकाराम निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली २३ नोव्हेंबरपासून हे आंदोलन सुरू असून, विविध १७ मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

वारंवार निवेदने देऊनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. यामध्ये १ जानेवारी २०११ पूर्वीची पात्र निवासी अतिक्रमणे शासन निर्णयानुसार नियमित करणे, नगरपरिषदेच्या काही ठरावांचा फेरविचार करणे, शहरातील विविध वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज व्यवस्था सुधारणे अशा मागण्यांचा समावेश आहे.

अनुसूचित जाती-जमातींच्या वस्त्यांमधील आरोग्य व नागरी सुविधांचे प्रश्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे सुशोभीकरण, अनधिकृत बांधकामांवरील कारवाई, बॅनर व जाहिरात फलकांच्या नियमांची अंमलबजावणी तसेच कंत्राटी कामगारांचे वेतन व सुविधांचे प्रश्नही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केले आहेत.

या आंदोलनात नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आयोजकांनी घेतली आहे.

दरम्यान, शहरातील या १७ मागण्यांवर नगर परिषद प्रशासन काय भूमिका घेते आणि संबंधित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कोणती पावले उचलली जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Back to top button