क्राईम रिपोर्ट

बारामतीत संतापजनक प्रकार! मुलगा हवा म्हणून गर्भपाताचा आरोप; संबंधित डॉक्टरांवरही कारवाई होणार का?

साडेतीन महिन्यांचा गर्भ पाडल्याची तक्रार; मारहाण, मानसिक छळ आणि धमकावल्याचेही आरोप; संबंधित डॉक्टरांवर कारवाई होणार का, चर्चेला उधाण!

बारामतीत संतापजनक प्रकार! मुलगा हवा म्हणून गर्भपाताचा आरोप; संबंधित डॉक्टरांवरही कारवाई होणार का?

साडेतीन महिन्यांचा गर्भ पाडल्याची तक्रार; मारहाण, मानसिक छळ आणि धमकावल्याचेही आरोप; संबंधित डॉक्टरांवर कारवाई होणार का, चर्चेला उधाण!

बारामती वार्तापत्र 

बारामतीतून एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुलगा हवा या हव्यासापोटी विवाहितेवर इच्छेविरुद्ध गर्भपात करण्यासाठी दबाव आणल्याचा, तसेच शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पतीसह सासू, दीर आणि जाऊ अशा चौघांविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून संबंधित रुग्णालय आणि डॉक्टरांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

मुस्कान वसीम मुलाणी (वय २७, सध्या रा. भांडुप पश्चिम, मुंबई, मूळ रा. जळोची, ता. बारामती) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी यांना पहिली मुलगी असल्याने दुसऱ्या गर्भधारणेत मुलगाच झाला पाहिजे, असा आग्रह सासरच्या मंडळींकडून धरला जात होता. गर्भातील बाळाची लिंगतपासणी करून मुलगी असल्यास गर्भपात करण्यासाठी पती वसीम मुबारक मुलाणी याच्यासह सासू, दीर आणि जाऊ यांनी दबाव आणल्याचा आरोप आहे.

मात्र, या प्रकाराला फिर्यादीने विरोध केल्यानंतर तिला मारहाण करणे, शिवीगाळ करणे आणि दमदाटी करून मानसिक त्रास देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

रुग्णालयात नेऊन इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याचा आरोप!

तक्रारीतील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे १८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री साडेनऊ वाजल्यापासून १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी चार वाजेपर्यंतच्या कालावधीत फिर्यादीला बारामती बसस्थानकाच्या पाठीमागील डॉ. सतीश व्ही. देवकाते यांच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध साडेतीन महिन्यांचा गर्भपात घडवून आणल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

इतकेच नव्हे, तर अपघातामुळे गर्भपात झाल्याचे सांगून माहेरच्या मंडळींची दिशाभूल करण्यात आल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे. त्यानंतरही छळ सुरूच राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

डॉक्टरांवर गुन्हा दाखल होणार का?

या प्रकरणात पतीसह चार नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असला, तरी कथित गर्भपात ज्या रुग्णालयात झाल्याचा आरोप आहे, त्या रुग्णालयातील डॉक्टरांची भूमिका काय होती, गर्भपात कोणत्या परिस्थितीत करण्यात आला आणि त्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पाळण्यात आली होती का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

विशेषतः गर्भलिंगनिदान आणि स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंधक कायद्याच्या अनुषंगाने या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. मात्र, डॉक्टरांवर गुन्हा दाखल होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. संबंधित डॉक्टर दोषी आहेत, असा निष्कर्ष तपासापूर्वी काढता येणार नाही.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ८९, ८५, ८६, ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनम जगताप करीत आहेत.

मात्र, या प्रकरणातून एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुलगा-मुलगी असा भेद करून महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्या शरीरावर निर्णय लादण्याचा अधिकार कुणाला दिला? आता पोलिसांच्या तपासातून या गंभीर प्रकरणातील सत्य बाहेर येणार का आणि संबंधित रुग्णालयाच्या भूमिकेची चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button