क्राईम रिपोर्ट

दोन लाखांच्या खंडणीसाठी थेट फायरिंग! बारामतीत गोळीबार करणारे आरोपी आठ तासांत जेरबंद; दोन पिस्तुले जप्त!

पाच तपास पथके मैदानात!

दोन लाखांच्या खंडणीसाठी थेट फायरिंग! बारामतीत गोळीबार करणारे आरोपी आठ तासांत जेरबंद; दोन पिस्तुले जप्त!

पाच तपास पथके मैदानात!

बारामती वार्तापत्र

दोन लाख रुपयांची खंडणी मागितली, पैसे देण्यास नकार मिळताच थेट गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पसार झाले! बारामती तालुक्यातील शिवशंभो नगर परिसरात घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेने शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, बारामती तालुका पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने वेगवान तपास करत अवघ्या आठ तासांत आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी राजन धनंजय कोळेकर (वय ३५, रा. शिवशंभो नगर, बारामती) यांच्याकडे बंड्या उर्फ अक्षय काळे आणि त्याच्या दोन साथीदारांनी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली होती.

मात्र, खंडणी देण्यास नकार दिल्याने आरोपींनी फिर्यादी यांच्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर पिस्तुलातून गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

पाच तपास पथके मैदानात!

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींच्या शोधासाठी तब्बल पाच तपास पथके रवाना केली. बारामती तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी समांतर तपास सुरू केला.

या तपासादरम्यान दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली दोन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत.

या गोळीबारात बंड्या उर्फ अक्षय काळे हा साथीदारही सहभागी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्याचाही शोध घेऊन त्याला अटक करण्यात आल्याची माहिती प्रेस नोटमध्ये देण्यात आली आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यामध्ये बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, तपास पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या पथकाने सहभाग घेतला.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पवार करीत आहेत.

Back to top button