क्राईम रिपोर्ट

बारामतीत माजी सैनिकाला पोलिसांच्या नावाने गंडा! झडतीच्या बहाण्याने दोन लाखांचे सोने लंपास; दोघांचा कारनामा!

रक्षक बनून आले, लुटारू निघाले!

बारामतीत माजी सैनिकाला पोलिसांच्या नावाने गंडा! झडतीच्या बहाण्याने दोन लाखांचे सोने लंपास; दोघांचा कारनामा!

रक्षक बनून आले, लुटारू निघाले!

बारामती वार्तापत्र 

बारामतीत भामट्यांनी आता ज्येष्ठ नागरिकांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. स्वतःला पोलीस असल्याचे भासवून एका ८५ वर्षीय माजी सैनिकाच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, दागिन्यांच्या दुकानातून बाहेर पडल्यानंतर काही अंतरावरच दोघांनी त्यांना गाठले आणि पोलिसांचा बनाव करून तपासणीच्या नावाखाली हातचलाखी केली. या प्रकारात तब्बल २ लाख ५ हजार १३५ रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या चोरीला गेल्या आहेत.

या घटनेमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, बारामतीत भामट्यांना कायद्याचा धाक उरला आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पेडगाव येथील रहिवासी असलेले ८५ वर्षीय माजी सैनिक साहेबराव रामभाऊ खेडकर हे जुन्या अंगठ्या बदलून दोन नवीन अंगठ्या बनवण्यासाठी बारामतीतील चंदूकाका सराफ येथे आले होते. काम आटोपून ते नातेवाईकासोबत दुचाकीवरून परत जात असताना १४ नोव्हेंबर रोजी मेदड गावाजवळील कॅनॉल पुलावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडवले.

‘आम्ही पोलीस आहोत, बारामतीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे,’ असे सांगत या दोघांनी खेडकर यांची तपासणी करण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या. त्या रुमालात गुंडाळून पुन्हा त्यांच्या हातात दिल्याचा बनाव करण्यात आला. मात्र, भामट्यांनी याच संधीचा फायदा घेत अंगठ्या हातोहात लंपास केल्या.

काही वेळाने संशय आल्याने खेडकर यांनी रुमाल उघडून पाहिला असता त्यांना धक्काच बसला. रुमालात सोन्याच्या अंगठ्याच नव्हत्या! सुमारे १२.५९० ग्रॅम वजनाच्या या अंगठ्यांची किंमत २ लाख ५ हजार १३५ रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

घटनेनंतर घाबरलेल्या खेडकर यांनी सुरुवातीला कोणालाही याबाबत सांगितले नाही. मात्र, नंतर मुलगी आणि नातवंडांच्या मदतीने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा बारामती शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

संशयितांचे वर्णन : एका संशयिताचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे, उंची जास्त, शरीरयष्टी मजबूत आणि रंग गोरा असल्याचे सांगण्यात आले आहे. तर दुसरा संशयित सावळ्या रंगाचा असल्याची माहिती आहे.

ज्येष्ठ नागरिकांनो, सावधान!

पोलीस असल्याचे सांगून रस्त्यात अडवणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. अधिकृत ओळखपत्राची खात्री करा आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडे दागिने किंवा मौल्यवान वस्तू देऊ नका. संशयास्पद प्रकार दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधा.

Back to top button