बारामतीत वाहतूक पोलिसांचा दणका! तिरंगा सर्कलवर ३ तासांत १०३ वाहनांवर कारवाई; ९१ हजारांचा दंड!
रॉंग साईड, काळ्या काचा, ट्रिपल सीट अन् विनानंबर प्लेट वाहनचालकांवर वाहतूक शाखेची धडक मोहीम!

बारामतीत वाहतूक पोलिसांचा दणका! तिरंगा सर्कलवर ३ तासांत १०३ वाहनांवर कारवाई; ९१ हजारांचा दंड!
रॉंग साईड, काळ्या काचा, ट्रिपल सीट अन् विनानंबर प्लेट वाहनचालकांवर वाहतूक शाखेची धडक मोहीम!
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांविरोधात बारामती शहर वाहतूक शाखेने जोरदार कारवाई केली आहे. शहरातील तिरंगा सर्कल येथे मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १:३० या तीन तासांच्या कालावधीत विशेष वाहतूक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तब्बल १०३ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, संबंधित वाहनचालकांना एकूण ९१ हजार ३०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
या विशेष मोहिमेत रॉंग साईडने वाहन चालविणे, वाहनांच्या काचांना काळ्या फिल्म लावणे, ट्रिपल सीट प्रवास करणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, विनानंबर प्लेट वाहने चालविणे, तसेच ब्रोकन नंबर प्लेट अशा विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
शहरातील वाहतूक शिस्त कायम राहावी, अपघातांना आळा बसावा आणि वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुभाष काळे, सहायक फौजदार महेश माने, मल्हारे, महिला पोलीस हवालदार सुनीता ढेंबरे, दोरके, सविता धुमाळ, पोलीस हवालदार रमेश काळे, पोलीस अंमलदार आकाश कांबळे तसेच आरसीपी पथक बऱ्हाणपूर यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
वाहतुकीचे नियम पाळा, सुरक्षित प्रवास करा! नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचा स्पष्ट संदेश या मोहिमेतून वाहनचालकांना मिळाला आहे.






