स्थानिक

बारामती तालुक्यातील म्हसोबानगर ग्रामपंचायतीला मोठा प्रशासकीय धक्का! दोन सदस्य अपात्र; सरपंचपदही गेले!

अतिक्रमण आणि जात वैधता प्रमाणपत्राचा मुद्दा भोवला

बारामती तालुक्यातील म्हसोबानगर ग्रामपंचायतीला मोठा प्रशासकीय धक्का! दोन सदस्य अपात्र; सरपंचपदही गेले!

अतिक्रमण आणि जात वैधता प्रमाणपत्राचा मुद्दा भोवला

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुक्यातील म्हसोबानगर ग्रामपंचायतीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र वाद अर्जांवर निर्णय देताना पुण्याचे अपर जिल्हाधिकारी यांनी दोन सदस्यांना अपात्र ठरवले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये विद्यमान सरपंच गणेश धनसिंग कांबळे यांचाही समावेश असल्याने ग्रामपंचायतीच्या राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले आहे.

मिळालेल्या कागदपत्रांनुसार, म्हसोबानगर येथील महादेव सर्जेराव कोकरे यांनी संतोष ज्ञानदेव टेंगले आणि गणेश धनसिंग कांबळे यांच्याविरोधात पुणे येथील अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे स्वतंत्र अपात्रता वाद अर्ज दाखल केले होते.

या अर्जांमध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम १४(१)(ज-३) अंतर्गत शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा मुद्दा, तसेच कलम १०(१-अ) अन्वये जात पडताळणी प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

या प्रकरणांची सुनावणी आणि उपलब्ध कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर अपर जिल्हाधिकारी सतीश ज्ञानदेव राऊत यांनी दोन्ही प्रकरणांत अपात्रतेचे आदेश पारित केले.

दोन स्वतंत्र आदेश, दोघांवर अपात्रतेची कारवाई!

या निर्णयानुसार संतोष ज्ञानदेव टेंगले यांना ग्रामपंचायत सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. तर गणेश धनसिंग कांबळे यांना ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच या दोन्ही पदांवर राहण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे.

या निर्णयामुळे म्हसोबानगर ग्रामपंचायतीतील सध्याच्या राजकीय समीकरणांवर परिणाम होणार आहे. विशेषतः सरपंचपद रिक्त होण्याची आणि पुढील प्रशासकीय प्रक्रियेची चर्चा सुरू झाली आहे.

आता पुढे काय?

दोन सदस्यांच्या अपात्रतेच्या आदेशानंतर ग्रामपंचायतीतील पुढील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. सरपंचपदाची पुढील प्रक्रिया कशी पार पडणार? रिक्त झालेल्या जागांबाबत काय निर्णय होणार? तसेच या आदेशांविरोधात संबंधितांकडून पुढील कायदेशीर पाऊल उचलले जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

म्हसोबानगरच्या ग्रामपंचायतीत दोन सदस्यांच्या अपात्रतेने निर्माण झालेली ही परिस्थिती सध्या तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

Back to top button