‘एक टक्काही तडजोड नाही’;पोषण आहारात हलगर्जीपणा भोवणार! बारामतीसह तीन तालुक्यांतील शाळा रडारवर
मुंढेंचे FDA अधिकारी मैदानात!

‘एक टक्काही तडजोड नाही’;पोषण आहारात हलगर्जीपणा भोवणार! बारामतीसह तीन तालुक्यांतील शाळा रडारवर
मुंढेंचे FDA अधिकारी मैदानात!
बारामती वार्तापत्र
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने आता कडक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित, पौष्टिक आणि संतुलित आहार मिळावा यासाठी शाळांच्या धान्य साठवणुकीपासून ते प्रत्यक्ष आहाराच्या गुणवत्तेपर्यंत तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बारामती, दौंड आणि शिरूर या तीन तालुक्यांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये अचानक तपासणी करण्यात येणार असून, कोणत्याही शाळेतून धान्याचे नमुने घेऊन ते शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. प्रयोगशाळेतील अहवालानुसार संबंधित शाळा किंवा प्रशासनावर पुढील कारवाई केली जाणार आहे.
धान्याची मागणी गरजेनुसारच
शाळांनी अनावश्यकपणे मोठ्या प्रमाणात धान्याचा साठा करून ठेवू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. शिल्लक धान्यसाठ्याचा नियमित आढावा घेऊन पुढील गरजेनुसारच धान्याची मागणी नोंदविण्याचे निर्देश आहेत.
भारतीय अन्न महामंडळाकडून प्राप्त होणाऱ्या तांदळाच्या पोत्यांची उत्पादन तारीख, वापरण्याची मुदत आणि प्रत्यक्ष वजन तपासूनच माल स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धान्याच्या गुणवत्तेबाबत शंका आल्यास प्रकरण तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मेनूनुसारच विद्यार्थ्यांना पोषण आहार
विद्यार्थ्यांना जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या साप्ताहिक मेनूनुसारच पोषण आहार देण्यावर भर देण्यात आला आहे. आहाराची गुणवत्ता, स्वच्छता, साठवणूक आणि अन्न सुरक्षिततेच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याचीही तपासणी केली जाणार आहे.
FDA अधिकारीही मैदानात
विद्यार्थ्यांच्या ताटात जाणारे अन्न सुरक्षित आहे की नाही, यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून स्वच्छता, अन्न सुरक्षितता आणि आवश्यक मानकांबाबत मार्गदर्शन तसेच तपासणी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनाही या प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाणार आहे.
‘एक टक्काही तडजोड नाही’
धान्याची गुणवत्ता, वजन, साठवणूक आणि स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
“विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि पोषण हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.
पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत एक टक्काही तडजोड केली जाणार नाही. धान्याची गुणवत्ता, वजन, साठवणूक आणि स्वच्छतेवर कडक नजर असेल,” असे जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, तीन तालुक्यांतील अचानक तपासणीमुळे शाळा प्रशासनाचे धाबे दणाणले असून, पोषण आहार योजनेतील धान्याची गुणवत्ता आणि व्यवस्थापन आता प्रशासनाच्या रडारवर आले आहे.






