राऊतांच्या सभेत राडा अन् राजकीय आरोप-प्रत्यारोप; बारामती तालुक्यातील मोरगावात ‘रामरक्षा’ आंदोलन तापलं!
‘आमचा कार्यक्रम यशस्वी झाला हे त्यांना पाहवलं नाही’;

राऊतांच्या सभेत राडा अन् राजकीय आरोप-प्रत्यारोप; बारामती तालुक्यातील मोरगावात ‘रामरक्षा’ आंदोलन तापलं!
‘आमचा कार्यक्रम यशस्वी झाला हे त्यांना पाहवलं नाही’
बारामती वार्तापत्र
अयोध्येतील राम मंदिराच्या देणग्यांमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुकारलेल्या ‘रामरक्षा’ आंदोलनासाठी खासदार संजय राऊत आज बारामती तालुक्यातील मोरगाव येथे पोहोचले. यावेळी रामरक्षा पठण आणि आंदोलनाचा कार्यक्रम पार पडला. मात्र, कार्यक्रमादरम्यान गोंधळ झाल्याने वातावरण चांगलेच तापले.
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या गोंधळामागे भाजपचे पदाधिकारी असल्याचा आरोप केला आहे. कार्यक्रमात राडा घालणाऱ्यांची अद्याप ओळख पटलेली नसून, त्यांची माहिती घेऊन पोलिसांत तक्रार देणार असल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले.
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या आरोपानुसार, कार्यक्रम यशस्वी होत असल्याचे पाहून विरोधकांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातला. संबंधित लोक युतीशी संबंधित असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, या आरोपांवर भाजपची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
राऊतांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
रामरक्षा पठणानंतर बोलताना संजय राऊत यांनी राम मंदिराच्या देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर जोरदार टीका केली. राम मंदिरासाठी कारसेवकांनी बलिदान दिल्याचा उल्लेख करत त्यांनी मंदिराशी संबंधित आर्थिक व्यवहारांवर प्रश्न उपस्थित केले.
“रामाने सत्ता दिली आणि त्याच रामाच्या मंदिरात चोरी होते,” असा आरोप करत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच, “बारामतीकरांनो जागे व्हा,” असे आवाहनही त्यांनी केले.
बाबरी मशीद पाडण्याच्या आंदोलनाचा संदर्भ देत राऊत यांनी शिवसेनेलाच रामरक्षा आंदोलनाचा अधिकार असल्याचा दावा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोरगावातील राजकीय वातावरण आणखी तापले.
दरम्यान, कार्यक्रमातील गोंधळ नेमका कशामुळे झाला आणि त्यामागे कोण होते, याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.






