क्राईम रिपोर्ट

बारामतीत हॉटेलमध्ये घुसून व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला! कोयता-दांडक्यांनी तिघांनी केली बेदम मारहाण

तोंडाला रुमाल, हातात कोयते-दांडके!

बारामतीत हॉटेलमध्ये घुसून व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला! कोयता-दांडक्यांनी तिघांनी केली बेदम मारहाण

तोंडाला रुमाल, हातात कोयते-दांडके!

बारामती वार्तापत्र

शहरातील इंदापूर रोडवरील मोतीबाग परिसरात हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकावर तिघांनी कोयता आणि लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना ४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या हल्ल्यात व्यावसायिकाच्या पोटावर, डोक्यावर, हातावर, पाठीवर आणि डोळ्यावर गंभीर दुखापती झाल्या आहेत. याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मज्जीत दामोदर राज्य (वय ३१, रा. तांबेनगर, बारामती) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. राज्य हे ॲश विटा तसेच कृष्णा डेअरी फार्मचा व्यवसाय करतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य हे आपल्या मित्रांसोबत हॉटेल सृजन येथे जेवण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर ते बिल देण्यासाठी काऊंटरजवळ गेले असताना तोंडाला रुमाल बांधलेले तीन जण अचानक हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यापैकी एका व्यक्तीच्या हातात कोयता, तर अन्य दोघांच्या हातात लाकडी दांडकी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

तिघांनी राज्य यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात करत अचानक मारहाण केली. परिस्थिती पाहून त्यांचे मित्र तेथून निघून गेल्यानंतर हल्लेखोरांनी राज्य यांना घेरून कोयता, लाकडी दांडके तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

हल्लेखोराने कोयत्याने पोटावर वार केला, तर लाकडी दांडक्यांनी डोके, हात, पाठ, पोट आणि डोळ्यावर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे हॉटेल परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत राज्य यांनी तातडीने ११२ क्रमांकावर संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

दरम्यान, हॉटेलमधील CCTV फुटेजच्या आधारे संशयितांची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. फिर्यादीत आदेश रमेश देशमुख, गोफणे, एमआयडीसी वंजारवाडी येथील शेतकरी राजा हा टेलचे मालक तसेच एका अनोळखी इसमाचा उल्लेख करण्यात आला आहे. यातील काही संशयितांची पूर्ण नावे व पत्ते अद्याप स्पष्ट नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक टेळकीकर पुढील तपास करीत आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण काय, हल्लेखोरांनी व्यावसायिकाला लक्ष्य का केले आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

 

Back to top button