क्राईम रिपोर्ट

१४ वर्षीय मुलगी रात्री बेपत्ता, पहाटे मृतदेह आढळला; रोहित पवारांच्या PAच्या मुलीच्या मृत्यूने खळबळ

“खरं काय घडलं, हे समोर यायलाच हवं” 

१४ वर्षीय मुलगी रात्री बेपत्ता, पहाटे मृतदेह आढळला; रोहित पवारांच्या PAच्या मुलीच्या मृत्यूने खळबळ

“खरं काय घडलं, हे समोर यायलाच हवं”

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरातील रुई परिसरातील साईनगर येथे १४ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही मुलगी आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहाय्यकांची मुलगी असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री किरकोळ कारणावरून मुलीचे आईसोबत बोलणे झाले होते. त्यानंतर ती घराबाहेर गेली. बराच वेळ होऊनही ती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांकडे ती बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली. रविवारी पहाटे साईनगर परिसरात तिचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत्यूचे नेमके कारण काय आहे, हे शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकरणात कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नसून पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात आहेत.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना, “अजित माझ्यासोबत जिल्हा परिषदेनपासून आहे. मृत्यू कसा झाला हे पोलीस सांगतील. काय झालं हे तपासणी झाल्यानंतर कळेल. एवढ्या कमी वयात अशी घटना घडली असेल तर ते समजण्यापलीकडचं आहे,” असे म्हटले.

यावेळी त्यांनी डीवायएसपी आणि डॉक्टरांसोबत चर्चा झाल्याचे सांगत शवविच्छेदनाच्या प्रक्रियेत हलगर्जीपणा होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. “खरं काय घडलं, कशामुळे घडलं हे समजायला हवं. त्यानंतर मी अधिक बोलेन,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

बारामतीतील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरही रोहित पवार यांनी चिंता व्यक्त केली. “पोलिसांचा वचक कमी झाला आहे, असं बोलता येईल. इतर ज्या घटना घडत आहेत, त्याबाबत होम डिपार्टमेंट कमी पडतंय,” अशी टीका त्यांनी केली.

बारामतीमध्ये यापूर्वी प्रत्येक कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला होता, असे सांगत हा प्रकल्प अद्याप पूर्ण न झाल्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “अनेक वर्षे जाऊनसुद्धा हा प्रकल्प मंजूर झाला नाही. बारामतीचं नाव होतं म्हणून हे झालं नाही का?” असा सवाल त्यांनी केला.

मात्र, या घटनेवर सध्या घाईघाईने निष्कर्ष काढणार नसल्याचे सांगत त्यांनी तपास यंत्रणेला काम करू देण्याची भूमिका घेतली. “आम्ही आताच काही बोलणार नाही. हे सगळं पोलिसांवर सोडलं आहे. पोलिसांकडून कामचुकारपणा झाला तर महागात पडेल. त्यातला गुन्हेगारीचा मुद्दा महत्त्वाचा आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यूमुळे साईनगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो आणि मृत्यूचे नेमके कारण काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button