बारामतीत आई-मुलाचा दुर्दैवी मृत्यू; तांदुळवाडीतील घटनेने खळबळ
BNSS कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद

बारामतीत आई-मुलाचा दुर्दैवी मृत्यू; तांदुळवाडीतील घटनेने खळबळ
BNSS कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद
बारामती वार्तापत्र
तांदुळवाडी येथील दादा पाटीलनगर परिसरात आई आणि १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. २१ ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली. रमा विजय गावडे (वय ४१) आणि विवेक विजय गावडे (वय १७) अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांचे कुटुंबीय दादा पाटीलनगर, तांदुळवाडी येथे राहत होते. मृत महिलेचे पती विजय गावडे हे २० ऑगस्ट रोजी रात्रीच्या ड्युटीसाठी गेले होते. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ते घरी परतले असता घराचा दरवाजा बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यांनी पत्नी रमा आणि मुलाला आवाज दिला; मात्र दरवाजा उघडला गेला नाही. त्यानंतर शेजाऱ्याच्या मदतीने दरवाजा उघडून पाहिले असता मुलगा विवेक घरातील खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. तसेच रमा गावडे या खिडकीजवळ निश्चल अवस्थेत आढळल्या.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी पोलिसांना कळविले. दोघांना उपचारासाठी बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दोघांनाही उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात BNSS कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
प्राथमिक तपास पोलीस हवालदार काळे करीत आहेत.






