अचानक लेन बदलली अन् दुचाकीला धडक; बारामतीत तरुणाचा मृत्यू, हायवा चालक पसार
मित्र गंभीर जखमी

अचानक लेन बदलली अन् दुचाकीला धडक; बारामतीत तरुणाचा मृत्यू, हायवा चालक पसार
मित्र गंभीर जखमी
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील कण्हेरी येथील सावळ पुलाजवळ महामार्गावर हायवाने दुचाकीला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला.
अर्जुन अनिल विटकर (वय २६, रा. लिमटेक, ता. बारामती) असे मृत तरुणाचे नाव असून, इंद्रजित विठ्ठल खंडाळे (रा. लिमटेक, ता. बारामती) हा गंभीर जखमी झाला आहे.
हा अपघात गुरुवारी (दि. २० ऑगस्ट) सकाळी साडेआठच्या सुमारास कण्हेरी येथील सावळ पुलाजवळ महामार्गावर झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन विटकर व इंद्रजित खंडाळे हे दुचाकीवरून जात असताना हायवा (क्र. एमएच ४५-१२४७) चालकाने अचानक लेन बदलून दुचाकीसमोर येत धडक दिली.
या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. अर्जुन विटकर यांचा मृत्यू झाला, तर इंद्रजित खंडाळे यांना गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर जखमींना मदत न करता हायवा चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी अमन सुनील विटकर (वय २८, रा. लिमटेक) यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास बारामती तालुका पोलिस करीत आहेत






