बारामतीत नैसर्गिक प्रसूतीचा जागर! SOMI च्या देशव्यापी पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; आई-बाळाच्या सुरक्षिततेचा दिला संदेश!
महिलांना सन्मानपूर्वक आरोग्यसेवा मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू

बारामतीत नैसर्गिक प्रसूतीचा जागर! SOMI च्या देशव्यापी पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; आई-बाळाच्या सुरक्षिततेचा दिला संदेश!
महिलांना सन्मानपूर्वक आरोग्यसेवा मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू
बारामती वार्तापत्र
माता आणि नवजात बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी तसेच नैसर्गिक प्रसूतीचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी बारामतीत रविवारी जनजागृतीचा अनोखा उपक्रम पार पडला. सोसायटी ऑफ मिडवाइव्हज इंडिया (SOMI), महाराष्ट्र चॅप्टरच्या वतीने ‘Nationwide Walk for Natural Birthing’ या देशव्यापी अभियानांतर्गत भव्य जनजागृती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि नैसर्गिक प्रसूतीचा प्रभावी संदेश देण्यात आला.
सध्याच्या काळात वाढत्या सिझेरियन प्रसूतींच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक असेल तेव्हाच शस्त्रक्रियेचा पर्याय स्वीकारण्याबरोबरच सुरक्षित नैसर्गिक प्रसूतीला प्रोत्साहन देण्याची गरज या अभियानातून अधोरेखित करण्यात आली.
गर्भवती महिलांमध्ये सामान्य प्रसूतीबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, प्रशिक्षित मिडवाइफच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आणि प्रसूतीदरम्यान महिलांना सन्मानपूर्वक आरोग्यसेवा मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.
या पदयात्रेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, बारामतीच्या अधिष्ठाता डॉ. सौ. अंजली पाटील, रुग्णालयाच्या अधिसेविका सौ. सीमा माने, शासकीय परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्य तथा SOMI महाराष्ट्र चॅप्टरच्या सचिव डॉ. संगीता भुजबळ, शारदाबाई पवार नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य सौ. वीणा जाधव, गिरीराज कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य श्री. अभिजित वानखडे आणि Global Shapers Community, Baramati Hub च्या भारवी मुलमुले यांची उपस्थिती होती.
यावेळी अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांनी सामान्य व नैसर्गिक प्रसूतीचे महत्त्व स्पष्ट करत गर्भवती महिलांमध्ये योग्य माहिती आणि जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
बारामती शहर पोलीस स्टेशन येथून सुरू झालेली ही पदयात्रा नटराज कला मंदिर, तिरंगा चौक येथे उत्साहात संपन्न झाली. पदयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्याधर काटे सर, विद्यानगरी मेडिकलचे सचिन मोकाशी तसेच FORSAPIO FOUNDATION चे सौरभ काटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
विशेष म्हणजे, SOMI च्या या देशव्यापी अभियानाला महाराष्ट्रातील विविध विभाग आणि जिल्ह्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध ठिकाणी पदयात्रा व जनजागृतीपर कार्यक्रमांच्या माध्यमातून नैसर्गिक प्रसूतीचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचविण्यात आला.






