स्थानिक

अमरावतीतील दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी बारामती मेडिकल कॉलेजमध्ये खबरदारी; ICUची पाहणी

विद्युत व्यवस्था आणि फायर सेफ्टीकडे विशेष लक्ष

अमरावतीतील दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी बारामती मेडिकल कॉलेजमध्ये खबरदारी; ICUची पाहणी

विद्युत व्यवस्था आणि फायर सेफ्टीकडे विशेष लक्ष

बारामती वार्तापत्र 

अमरावती येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरशी संबंधित दुर्घटनेत बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांनी रुग्णालयातील विविध अतिदक्षता विभागांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपलब्ध सुविधा, जीवनरक्षक उपकरणांची कार्यस्थिती आणि आपत्कालीन व्यवस्थेची तपासणी करण्यात आली.

अतिदक्षता विभागात कार्यरत असलेले व्हेंटिलेटर, मॉनिटर, ऑक्सिजन प्रणाली तसेच इतर जीवनरक्षक उपकरणे व्यवस्थित कार्यरत आहेत का, याची पाहणी करण्यात आली. तसेच विद्युत यंत्रणा आणि फायर सेफ्टीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना डॉ. पाटील यांनी दिल्या.

जीवनरक्षक उपकरणे चोवीस तास कार्यरत असल्याने त्यांची विद्युत जोडणी, वायरिंग, अर्थिंग, आपत्कालीन वीजपुरवठा तसेच उपकरणांवरील विद्युत भार यांची सुरक्षितता तपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा, फायर एक्स्टिंग्विशर, अलार्म व्यवस्था आणि आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गांचाही आढावा घेण्यात आला.

उपकरणांची नियमित तपासणी आवश्यक

जीवनरक्षक उपकरणांमध्ये कोणतीही तांत्रिक त्रुटी राहू नये यासाठी नियमित तपासणी आणि प्रतिबंधात्मक देखभाल करण्यावर भर देण्यात आला. कोणत्याही उपकरणात किंवा विद्युत व्यवस्थेत संभाव्य धोका आढळल्यास त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अमरावतीतील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य धोके आधीच ओळखून ते दूर करणे आवश्यक आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असून, विशेषतः अतिदक्षता विभागातील नवजात व बालरुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सर्व जीवनरक्षक सुविधा सुरक्षित आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी नियमित पाहणी करण्यात येत असल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Back to top button