कृषी पदवीधरांनी शास्त्रीय पद्धतीने शेती करून समाजामध्ये स्वतःचे उदाहरण निर्माण करावे- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते 'ॲग्रीकॉस २०२५' दिवाळी अंकाचे प्रकाशन

कृषी पदवीधरांनी शास्त्रीय पद्धतीने शेती करून समाजामध्ये स्वतःचे उदाहरण निर्माण करावे- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ‘ॲग्रीकॉस २०२५’ दिवाळी अंकाचे प्रकाशन
पुणे, प्रतिनिधि
महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कृषी पदवीधरांनी फार मोठी उंची गाठली आहे. विविध उद्योजक, राजकारणी, बांधकाम व्यावसायिक, प्रशासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ कृषी पदवीधर आहेत. कृषी पदवीधरांनी केवळ शासकीय नोकरी न लागता उत्तम शेती करून व शास्त्रीय पद्धतीने शेती करून समाजामध्ये स्वतः उदाहरण निर्माण करणे गरजेचं आहे. शेती हा केवळ व्यवसाय नाही, तर आपल्या संस्कृतीचा श्वास आहे. तो श्वास जिवंत ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे कृषी पदवीधरांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित ॲग्रीकॉस मासिकाच्या ‘ॲग्रीकॉस दिवाळी अंक २०२५’ चे प्रकाशनाच्यावेळी ते बोलत होते. यशदाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. शेखर गायकवाड, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुगाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, ॲग्रीकॉस दिवाळी अंक संपादक मंडळाचे सदस्य, विद्यार्थी, कृषी विद्यापीठांचे प्रतिनिधी तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित मान्यवर उपस्थित होते.
कृषी मंत्री श्री. भरणे म्हणाले, “अतिवृष्टीमुळं नुकसान झाल्याने आज राज्यभरातील शेतकरी खचला आहे. त्याला पुन्हा उभे राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमत्री अजित पवार यांनी एकतीश हजार सहाशे कोटी रुपयाचे शेतकऱ्यायांना मदतीसाठी विशेष पॅकेज जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याकरिता कृषी विभागाच्यावतीने नवनवीन योजना राबविण्यात येत आहे, कृषी विभागाच्या जवळपास ५० हून अधिक महत्वपूर्ण योजना आहेत, त्याचा ही शेतक-यांना लाभ मिळत आहे. येत्या काळामध्ये आपल्याला शेतीची दिशा बदलावी लागेल काय? असं सांगणारा हा काळ आहे. अशावेळी कृषी पदवीधरांनी या संकटाच्या काळात आपल्या ज्ञानाचा उपयोग करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
*ॲग्रीकॉस दिवाळी अंक हा शेतकऱ्यांच्या अनुभवांचा, संशोधनाचा आणि तरुणांच्या कल्पकतेचा उत्सव*
श्री. भरणे म्हणाले, ‘ॲग्रीकॉस दिवाळी अंक २०२५’ हा ॲग्रीकॉस आणि विनोद या विषयावर आधारित असून, शेती, ग्रामीण जीवन, नवकल्पना आणि विनोदी लेखन यांचा समतोल साधणारा अंक आहे. ॲग्रीकॉस दिवाळी अंक हा शेतकऱ्यांच्या अनुभवांचा, संशोधनाचा आणि तरुणांच्या कल्पकतेचा उत्सव आहे. या अंकाच्या निमित्ताने शेखर गायकवाड आणि त्यांचे सहकारी यांनी राज्यातील कृषी पदवीधरांना एकत्र आणून त्यांच्या संघटन शक्तीचा वापर सकारात्मकरित्या केले आहे. कृषी पदवीधरांची पहिली राज्य पातळीवरील कृषी पदवीधर पतसंस्था स्टेट ॲग्रीकॉस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या नावानं उभारण्यात आली आहे.
येत्या काळामध्ये ही संस्था शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्जापासून अन्य वित्तीय गरजा भागविण्यामध्ये निश्चितपणे योगदान देईल. नुकताच शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला आहे. याप्रमाणेही कृषी विभागाने कृषी शिक्षणाच्या बाबतीतही अशाचप्रकारे निर्णय घेईल. पुणे कृषी महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेला दिलेल्या जागेबद्दल देखील माझ्याकडे संघटनेने मुद्दा लक्षात आणून दिला आहे, असेही श्री. भरणे म्हणाले.