राजकीय

डीएमकेचे नाराजीवर मार्ग निघेल विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न सुरू – शरद पवार

कोणत्याही पक्षाने टोकाची भूमिका घेऊ नये

डीएमकेचे नाराजीवर मार्ग निघेल
विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न सुरू – शरद पवार

कोणत्याही पक्षाने टोकाची भूमिका घेऊ नये

बारामती वार्तापत्र 

देशातील विरोधी पक्षांनी एकत्रितपणे काम करावे, हीच सर्वांची भूमिका आहे. विरोधी आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत असलेल्या डीएमकेसह सर्व घटक पक्षांशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढला जाईल, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

बारामतीतील गोविंदबाग येथे माध्यमांशी संवाद साधताना पवार म्हणाले की, पुढील तीन वर्षांत कोणतीही मोठी निवडणूक नसल्याने विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देशात सध्या दोन प्रमुख राजकीय प्रवाह दिसत आहेत.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांचा गट आहे, तर दुसरीकडे त्यांच्या विचारांशी असहमत असलेले पक्ष आहेत.

विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्ष काही ठिकाणी एकत्र लढले, तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे मैदानात उतरले. डीएमके विरोधी आघाडीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांबाबत विचारले असता पवार म्हणाले, आज तसे चित्र दिसत असले तरी प्रमुख नेत्यांना आठ-दहा दिवसांत बोलून चर्चा केली जाईल.

त्यातून निश्चितच काहीतरी मार्ग निघेल, याची मला खात्री आहे. खासदार सुप्रिया सुळे ज्या बैठकीला उपस्थित आहेत, ती बैठक आढावा घेण्यासाठीची असल्याचे सांगत कोणत्याही पक्षाने टोकाची भूमिका घेऊ नये, हा संदेश बैठकीत मांडला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेबाबत शेतकऱ्यांकडून येत असलेल्या तक्रारींवर बोलताना पवार म्हणाले की, सरकारने ठरवलेल्या निकषांमध्ये काही अडचणी असतील तर त्यावर चर्चेद्वारे तोडगा काढता येऊ शकतो. कर्जमाफीतील कमतरता दूर करून अधिकाधिक शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

राज्यातील वादळी वारे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पाच शास्त्रज्ञांनी नुकसानीची पाहणी करून अहवाल सादर केला आहे. निसर्गापुढे कोणाचेच चालत नाही; मात्र या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याचा विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button