क्राईम रिपोर्ट

डोरलेवाडीत मंदिर-सभागृहाच्या बांधकामावरून वाद चिघळला; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

ग्रामपंचायतीसमोर दोन गट आमनेसामने

डोरलेवाडीत मंदिर-सभागृहाच्या बांधकामावरून वाद चिघळला; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

ग्रामपंचायतीसमोर दोन गट आमनेसामने

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुक्यातील डोरलेवाडी येथील वैदू वस्ती परिसरात मंदिर व सभागृहाच्या बांधकामावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर आज डोरलेवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

वैदू वस्ती हद्दीतील ग्रामपंचायतीला बक्षीसपत्राद्वारे दिलेल्या खुल्या जागेत तसेच अमेनिटी स्पेसच्या जागेत मंदिर व सभागृहाचे बांधकाम करण्याच्या मुद्द्यावरून हा वाद निर्माण झाल्याची माहिती आहे. बांधकामाच्या जागेवरून दोन गटांमध्ये मतभेद निर्माण झाल्यानंतर प्रकरण ग्रामपंचायत पातळीवर पोहोचले.

आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर दोन्ही बाजूंच्या उपस्थितीमुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाकडून दोन्ही बाजूंमध्ये समन्वय साधून वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र दोन्ही गटांमध्ये एकमत न झाल्याने चर्चेतून कोणताही अंतिम तोडगा निघू शकला नाही.

तणावाची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले असून परिसरात शांतता राखण्यासाठी बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. मंदिर व सभागृहाच्या बांधकामासंदर्भातील जागेचा वाद पुढे कोणते वळण घेतो, याकडे डोरलेवाडी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Back to top button