स्थानिक

बारामतीत शाळेत पोलीस पोहोचले; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी Community Policingचा प्रभावी उपक्रम

छेडछाड, सायबर गुन्हे अन् व्यसनांपासून सावध!

बारामतीत शाळेत पोलीस पोहोचले; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी Community Policingचा प्रभावी उपक्रम

छेडछाड, सायबर गुन्हे अन् व्यसनांपासून सावध!

‘शक्ती बॉक्स’मधील तक्रारींची दखल; Good Touch–Bad Touch, सायबर सुरक्षा अन् व्यसनमुक्तीवर विद्यार्थ्यांशी संवाद

बारामती : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत बारामती शहर पोलिसांनी Community Policing अंतर्गत शाळांमध्ये थेट भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत कवी मोरोपंत शिक्षण संस्थेचे प्राथमिक, माध्यमिक व इंग्लिश मीडियम स्कूल, श्रीरामनगर-जळोची येथे पोलीस पथकाने भेट देत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

मा. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या आदेशानुसार, प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेण्यात आली.

‘शक्ती बॉक्स’मधील तक्रारींची पाहणी

शाळेतील ‘शक्ती बॉक्स’ अर्थात विद्यार्थी तक्रार पेटी उघडून त्यातील तक्रारींची पोलिसांनी पाहणी केली. प्राप्त झालेल्या किरकोळ स्वरूपाच्या बाबींची संवेदनशीलतेने दखल घेत संबंधित विद्यार्थ्यांची ओळख आणि गोपनीयता कायम ठेवण्यात आली. मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांशी संवाद साधून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

गैरवर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे केवळ शिक्षा म्हणून न पाहता त्यांच्या वर्तनाचे परिणाम समजावून सांगत योग्य समज देण्यावर पोलिसांनी भर दिला.

Good Touch–Bad Touch पासून सायबर सुरक्षेपर्यंत मार्गदर्शन

विद्यार्थ्यांना Good Touch–Bad Touch, लैंगिक शोषणापासून संरक्षण, छेडछाड, रॅगिंग, सायबर गुन्हे, सायबर बुलिंग, ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडिया व मोबाईलचा सुरक्षित वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना घ्यावयाची काळजी, व्यसनांपासून दूर राहणे, चुकीच्या संगतीपासून स्वतःचे संरक्षण, वाहतूक नियमांचे पालन आणि कोणतीही अडचण आल्यास पालक, शिक्षक अथवा पोलिसांशी निर्भयपणे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

‘पोलीस आपल्यासाठी आहेत’ हा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न

Police Kaka/Police Didi संकल्पनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनातील पोलिसांची भीती कमी करून विश्वासाचे नाते निर्माण करण्यावर बारामती शहर पोलिसांचा भर आहे.

विद्यार्थ्यांच्या समस्या सुरुवातीच्या टप्प्यावरच समजून घेऊन गंभीर घटना घडण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करता याव्यात, यासाठी शाळा, पालक, शिक्षक आणि पोलीस यांच्यातील समन्वय मजबूत करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या उपक्रमात म.पो.हवा. काळे, पो.शि. निंबाळकर, म.पो.कॉ. पंडित, पो.कॉ. विरकर व म.पो.कॉ. कदम यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

“विद्यार्थ्यांच्या मनात पोलिसांची भीती नव्हे, तर विश्वास निर्माण करणे आणि त्यांच्या समस्या गंभीर होण्यापूर्वी योग्य मदत पोहोचवणे, हे Community Policing चे खरे उद्दिष्ट आहे,” अशी भूमिका बारामती शहर पोलिसांनी व्यक्त केली.

Back to top button