
देशपांडे विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा
‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’
बारामती वार्तापत्र
म ए सो चे कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालयात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी व साहित्यकार वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त ‘अभिजात मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा झाला.
प्रमुख अतिथी प्रा. डॉ. श्रीराम गडकर यांनी ‘कणा’ या कवितेतील ‘पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा’ या ओळी द्वारे शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील पवित्र नाते स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की शिक्षण हे उशिरा फळ देणारे झाड असले तरी संयम ठेवून शिक्षण घ्या कारण शिक्षणाने मनुष्य अंतर्बाह्य समृद्ध होतो व अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी सज्ज होतो. ‘नटसम्राट’ या नाटकाचे आवर्जून वाचन करून तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या संदेशाची आजन्म अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. रोहिणी गायकवाड यांनी अध्यक्षीय मनोगतात आपली मराठी भाषा मधुर, रसाळ व जिव्हाळा निर्माण करणारी असल्याने प्रत्येकाने मराठी भाषेचा गौरव करून अभिमान बाळगावा असे प्रतिपादन केले.
शिक्षक मनोगतात शंकर घोडे यांनी ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ ही कविता सादर करून प्रत्येक मराठी माणसाने एकमेकांशी बोलताना मराठीतच बोलून भाषेचे संवर्धन करावे असे आवाहन केले.
अक्षरा गावडे या विद्यार्थिनीने आपल्या मनोगतात वि.वा. शिरवाडकरांच्या साहित्याचा आढावा घेतला.याप्रसंगी प्रा.सुनील खोमणे यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी उपमुख्याध्यापक राजाराम गावडे, पर्यवेक्षक शेखर जाधव, दिलीप पाटील, जयश्री शिंदे, तेजश्री शिंदे आदींनी मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यानिमित्ताने शाला समिती अध्यक्ष मा.अजय पुरोहित, महामात्र डॉ.गोविंद कुलकर्णी, समन्वयक पुरुषोत्तम कुलकर्णी, सल्लागार समिती सदस्य राजीवजी देशपांडे, फणेंद्र गुजर आदींनी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक रेवती झाडबुके यांनी केले तसेच सूत्रसंचालन आम्रपाली घोरपडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार सविता जेवरे यांनी मानले.