स्थानिक

निर्णयांपासून थेट अंमलबजावणीकडे; बारामती नगरपरिषदेच्या विकासकामांना पुन्हा वेग

आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली

निर्णयांपासून थेट अंमलबजावणीकडे; बारामती नगरपरिषदेच्या विकासकामांना पुन्हा वेग

आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपरिषदेची नवनियुक्त पदाधिकारी मंडळी कार्यरत झाल्यानंतर शहरातील विकासकामांना अपेक्षित गती मिळू लागली होती. मात्र, अचानक घडलेल्या दुःखद घटनेनंतर निर्माण झालेली परिस्थिती, त्यानंतरच्या तांत्रिक अडचणी आणि आचारसंहितेमुळे अनेक विकासकामांचा वेग काही काळ मंदावला होता. आता ही परिस्थिती पूर्वपदावर येत असून नगरपरिषद प्रशासनाने पुन्हा विकासकामांना गती देण्यास सुरुवात केली आहे.

आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष सचिन सातव, मुख्याधिकारी पंकज भुसे, सर्व समिती सभापती, नगरसेवक आणि नगरपरिषदेचे अधिकारी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करत असल्याचे चित्र दिसत आहे.नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे, मंजूर झालेल्या प्रस्तावांची अंमलबजावणीही तातडीने सुरू करण्यात आली असून संबंधित कामांसाठी आवश्यक निविदा विलंब न लावता प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे नगरपरिषदेच्या निर्णयप्रक्रियेसोबतच अंमलबजावणीवरही भर दिला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज प्रसिद्ध झालेल्या वर्तमानपत्रांमध्ये आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, बांधकाम तसेच नगरपरिषदेच्या स्थावर मालमत्तांच्या लिलावासंदर्भातील विविध निविदा व जाहिराती प्रसिद्ध झाल्या.

त्यामुळे नगरपरिषद घेत असलेले निर्णय केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रशासन वेगाने कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील वाढता समन्वय, तातडीने घेतले जाणारे निर्णय आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे बारामतीतील विकासकामांना नव्याने चालना मिळत असल्याचे चित्र आहे.

शहरातील मूलभूत सुविधांबाबत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने नगरपरिषद अधिक गतिमानपणे काम करत असल्याचेही यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.
—–
“बारामतीच्या विकासाचा वेग कायम राखणे, नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य देणे आणि नगरपरिषदेचे निर्णय तातडीने प्रत्यक्षात उतरवणे हेच आमचे ध्येय आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी बारामतीला दिलेला विकासाचा वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जयदादा पवार आणि पार्थदादा पवार यांच्या सहकार्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकसंघपणे काम करत आहेत. नागरिकांचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि विकासकामांची गतिमान अंमलबजावणी यावरच बारामतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमचा भर राहील.”–नगराध्यक्ष सचिन सातव म्हणाले,

Back to top button