परवानाधारक 27 हजार 539 रिक्षा चालकांच्या खात्यांमध्ये अनुदान जमा
-प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांची माहिती

परवानाधारक 27 हजार 539 रिक्षा चालकांच्या खात्यांमध्ये अनुदान जमा
-प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांची माहिती
■ सानुग्रह अनुदान योजनेत पुणे जिल्हयाची राज्यात आघाडी
■ 48 हजार 134 रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान मंजूर
■ परिवहन विभागामार्फत एक ऑनलाईन प्रणाली विकसित
पुणे, बारामती वार्तापत्र रिपोर्ट
जिल्हयातील रिक्षा परवाना धारकांना प्रत्येकी 1 हजार 500 रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान योजनेसाठी 55 हजार 897 प्राप्त अर्जापैकी 48 हजार 134 रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. 27 हजार 539 रिक्षा परवाना धारकांच्या थेट खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आले असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी दिली. सानुग्रह अनुदान योजनेत सर्वाधिक लाभार्थ्यांना लाभ देण्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हयाने राज्यात आघाडी घेतली आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने निर्बंध घालून दिले आहेत, त्यामुळे शासनाने राज्यातील रिक्षा चालकांना प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे, पुणे जिल्हयातील रिक्षा चालकांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होण्यास गतीने सुरूवात झाली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत ऑनलाईन पदधतीने रिक्षा चालकांच्या थेट खात्यात रक्कम जमा होण्यास सुरवात झाल्याने रिक्षाचालकांना आर्थिक आधार मिळू लागला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांनी रिक्षाचालकांना आर्थिक आधार देण्यासाठी सानुग्रह अनुदान योजना सुरू केली. परिवहन विभागामार्फत एक ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली असून 22 मे 2021 पासून परवानाधारक रिक्षा चालकांना ऑनलाईन पदधतीने अर्ज करण्यासाठी खुली करण्यात आली आहे.त्यापैकी पुणे जिल्हयात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत 72 हजार, पिंपरी चिंचवड 19 हजार 793 तर बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत एक हजार 839 परवानाधारक आहेत. त्यापैकी पुणे 41 हजार 562, पिंपरी चिंचवड 13 हजार 139 तर बारामती 1 हजार 196 एवढे अनुदान मागणीसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी पुणे 36 हजार 952, पिंपरी चिंचवड 10 हजार 282 तर बारामती 930 एवढे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. पुणे 4 हजार 610, पिंपरी चिंचवड 2 हजार 593, बारामती 266 एवढे अर्ज त्रुटीमुळे तात्पुरत्या स्वरूपात नाकारण्यात आले आहेत. तर पुणे 20 हजार 978, पिंपरी चिंचवड 6 हजार 125 व बारामती 436 अशा एकूण 27 हजार 539 रिक्षा परवाना धारकांना अनुदान थेट खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अनुदान मंजूरीसाठी एकही अर्ज प्रलंबित नाही.