
बारामतीकरांचे रक्त बारामतीकरांसाठीच
हजारो हातांनी जपली मानवतेची नाळ
बारामती वार्तापत्र
दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शारदा प्रांगण येथे आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. एक हजारांहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला. मात्र, यंदाच्या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे संकलित झालेले रक्त बारामतीतील स्थानिक रक्तपेढ्यांमध्येच उपलब्ध राहणार असल्याने त्याचा थेट लाभ तालुक्यातील गरजू रुग्णांना होणार आहे.
बारामतीमध्ये दरवर्षी विविध संस्थांकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. अनेकदा विविध भेटवस्तू, आकर्षक प्रलोभने किंवा इतर सुविधा देत रक्तदाते आकर्षित केले जातात. मात्र, त्या शिबिरांमधून संकलित होणारे रक्त अनेकदा बाहेरील रक्तपेढ्यांकडे पाठविले जात असल्याने स्थानिक गरजांच्या वेळी बारामतीतील रुग्णांना त्याचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याची भावना नागरिकांमध्ये होती. या पार्श्वभूमीवर यंदाच्या महारक्तदान शिबिरात संकलित झालेले रक्त स्थानिक रक्तपेढ्यांमध्येच साठविण्यात येणार असल्याने हा उपक्रम अधिक लोकाभिमुख आणि समाजोपयोगी ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
शिबिराच्या प्रारंभापासूनच रक्तदात्यांची मोठी गर्दी झाली होती. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रथमच रक्तदान करणाऱ्या युवक-युवतींची संख्या विशेष लक्षवेधी ठरली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि युवा नेते जय पवार यांनी शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांचे कौतुक केले. “रक्तदान हीच खरी समाजसेवा असून एका रक्तदात्यामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते,” असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोळेकर, नगराध्यक्ष सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशील सोमानी, उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, माजी जिल्हाध्यक्ष विश्वासराव देवकाते, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमानी, किशोर सराफ, माजी नगराध्यक्षा भारती मुथा, दूध संघाचे अध्यक्ष किशोर फडतरे, तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विविध सामाजिक संस्था, वैद्यकीय पथके, स्थानिक रक्तपेढ्या, स्वयंसेवक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. प्रत्येक रक्तदात्याचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांनी सर्व रक्तदाते, स्वयंसेवक, सामाजिक संस्था आणि वैद्यकीय पथकांचे आभार मानत भविष्यातही समाजहिताचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
महिनाभर समाजोपयोगी उपक्रम
स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि युवा नेते जय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीमध्ये महिनाभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महारक्तदान शिबिर हा त्यातील प्रमुख उपक्रम ठरला असून, याशिवाय ११ हजार वृक्षांचे वाटप तसेच अन्य समाजोपयोगी उपक्रमही राबविण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांनी दिली.






