क्राईम रिपोर्ट

बारामतीत कृत्रिम दूध निर्मितीवर धाड; मोठा साठा जप्त, आठ जणांवर गुन्हा

भेसळयुक्त दूध कोणकोणत्या दूध संकलन व शीतकरण केंद्रांपर्यंत पोहोचले

बारामतीत कृत्रिम दूध निर्मितीवर धाड; मोठा साठा जप्त, आठ जणांवर गुन्हा

भेसळयुक्त दूध कोणकोणत्या दूध संकलन व शीतकरण केंद्रांपर्यंत पोहोचले

बारामती वार्तापत्र

बारामती शहरातील अरिहंत मिनी मार्केट येथे कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा संशयित साठा आढळून आला. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या तक्रारीवरून बारामती शहर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमासह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या कारवाईमुळे कृत्रिम दूधनिर्मिती व पुरवठा करणाऱ्या संभाव्य रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याप्रकरणी संदीप अशोकलाल बागमार (रा. जगतापमळा, बारामती), नीलेश मोरे (साई ट्रेडिंग, आमराई बारामती), भोरी मॅडम (पूर्ण नाही, पुरानी ट्रेडर्स, श्रीरामनगर, बारामती), दत्तात्रय बावधे (रा. सोनवडी सुपे, ता. बारामती), दीपक पिसाळ (अधिराज एंटरप्रायजेस, जळोची), प्रवीण दातीर (रा. गणेशवाडी, अहिल्यानगर), सूरज सोलनकर (रा. सोनगाव, ता. बारामती), हेमंत टेके (हेमंत काॅर्पोरेशन, अकलूज, माळशिरस) असा गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी संदीप दिगंबरराव शिंदे यांनी फिर्याद दिली. ही कारवाई गुरुवारी (दि. १६) करण्यात आली. फिर्यादीनुसार, राज्यातील विविध भागांत कृत्रिम दूध तयार करून त्याचा पुरवठा होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार बारामतीतील अरिहंत मार्केट येथील आस्थापनाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत २५ किलोचे व्हे पावडरचे एक पोते, स्किम मिल्क पावडरची दोन पोती आणि व्हे परमिट पावडरची दोन पोती असा संशयित साठा आढळून आला.

तपासणीदरम्यान आस्थापनाचे मालक संदीप अशोकलाल बागमार यांच्याकडे संबंधित साहित्याच्या विक्रीची कागदपत्रे मागविण्यात आली. मात्र, त्यांनी समाधानकारक माहिती किंवा विक्री बिले सादर केली नाहीत. चौकशीत हा माल विविध दूध विक्रेते, संकलन केंद्रे आणि शीतकरण केंद्रांना पुरविण्यासाठी साठवून ठेवल्याचे पुढे आले.

पुरवठा साखळीचा तपास सुरू

तपासादरम्यान, या साहित्याचा पुरवठा व विक्री साखळीत गुन्हा दाखल झालेल्या अन्य सात जणांना दिला जात असल्याचे समोर आले. या संपूर्ण साखळीचा तपास सुरू असून, भेसळयुक्त दूध कोणकोणत्या दूध संकलन व शीतकरण केंद्रांपर्यंत पोहोचले, याचा शोध पोलिस व अन्न व औषध प्रशासन घेत आहेत.

Back to top button