स्थानिक

बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ISA Baramati ला राज्यस्तरीय पुरस्कार

Best Public Awareness Award मध्ये राज्यात द्वितीय क्रमांक; डॉ. सुजित अडसूळ यांचीही दुहेरी उल्लेखनीय कामगिरी

बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ISA Baramati ला राज्यस्तरीय पुरस्कार

Best Public Awareness Award मध्ये राज्यात द्वितीय क्रमांक; डॉ. सुजित अडसूळ यांचीही दुहेरी उल्लेखनीय कामगिरी

बारामती वार्तापत्र 

Anaesthesia Society of India (ISA) आयोजित SAMSCON 2026 – State Conference मध्ये ISA बारामती शाखेने राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पाचगणी येथे झालेल्या महाराष्ट्रातील भूलतज्ज्ञांच्या राज्यस्तरीय परिषदेत ISA Baramati शाखेला Best Public Awareness Award मध्ये राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला.

बारामती शाखेकडून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक जनजागृती उपक्रमांची राज्यस्तरावर दखल घेतली गेल्याने या यशामुळे बारामतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

याच परिषदेत डॉ. सुजित अडसूळ यांनी वैयक्तिक स्तरावरही उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांना Best Reviewer विभागात राज्यात द्वितीय क्रमांक, तसेच Best Public Awareness Individual या विभागात विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला.

पाचगणी येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्य भुलतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोसले, उपाध्यक्ष डॉ. विकास कर्णे, सचिव डॉ. शितल दलाल तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते डॉ. सुजित अडसूळ यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

जनजागृतीच्या कामाला राज्यस्तरीय पावती

ISA Baramati कडून गेल्या काही काळापासून विविध CPR प्रशिक्षण, Public Awareness उपक्रम, आरोग्यविषयक जनजागृती अभियान, विविध कार्यशाळा तसेच जीवन संजीवनी क्रियेचे प्रात्यक्षिक अशा लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमांमधून नागरिकांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत योग्य पद्धतीने मदत करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे काम केले जात आहे.

या उपक्रमांमागे ISA Baramati चे मार्गदर्शक डॉ. अशोक तांबे, डॉ. संजीव कोल्हटकर, संघटनेतील सर्व ज्येष्ठ भूलतज्ज्ञ तसेच सहकाऱ्यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

‘हे यश सामूहिक प्रयत्नांचे फलित’

ISA Baramati ला मिळालेले हे राज्यस्तरीय यश म्हणजे केवळ पुरस्कार नसून सामूहिक प्रयत्न, सातत्यपूर्ण टीमवर्क आणि समाजाभिमुख आरोग्यजागृतीच्या कार्याला मिळालेली राज्यस्तरीय पावती असल्याची भावना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

ISA Baramati च्या अध्यक्ष डॉ. निती महाडिक, सचिव डॉ. सुनयना नरुटे तसेच राज्य नियामक मंडळाचे सदस्य डॉ. सुजित अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली शाखेकडून विविध सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.

“ISA Baramati तर्फे सातत्याने CPR, Public Awareness तसेच विविध आरोग्यविषयक जनजागृतीचे उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांची आणि त्यामागील सातत्यपूर्ण टीमवर्कची राज्यस्तरावर झालेली ही दखल आहे,” अशी प्रतिक्रिया ISA Baramati चे मार्गदर्शक डॉ. अशोक तांबे यांनी व्यक्त केली.

बारामतीच्या वैद्यकीय क्षेत्रातील या उल्लेखनीय कामगिरीचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून, भविष्यातही आरोग्य जनजागृतीचे उपक्रम अधिक व्यापक करण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.

Back to top button