बालदिनाचा आनंद अन् नवजात बालकांच्या आरोग्याचा जागर! बारामतीत ‘नॅशनल न्यूबॉर्न केअर वीक’ उत्साहात साजरा!
चिमुकल्यांसाठी जादूचा प्रयोग, पालकांना बालसंगोपनाचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन

बालदिनाचा आनंद अन् नवजात बालकांच्या आरोग्याचा जागर! बारामतीत ‘नॅशनल न्यूबॉर्न केअर वीक’ उत्साहात साजरा!
चिमुकल्यांसाठी जादूचा प्रयोग, पालकांना बालसंगोपनाचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन!
बारामती वार्तापत्र
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथील बालरोग चिकित्सा शास्त्र विभागाच्या वतीने बालदिन आणि ‘नॅशनल न्यूबॉर्न केअर वीक’ उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून नवजात शिशूंची काळजी, सुरक्षितता, स्वच्छता, लसीकरण आणि बालआरोग्य याविषयी पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी १५ ते २१ नोव्हेंबरदरम्यान राष्ट्रीय नवजात शिशू काळजी सप्ताह साजरा केला जातो. यानिमित्त बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागात विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बालरोग चिकित्सा शास्त्र विभागप्रमुख डॉ. समीर पवार आणि अधिसेविका श्रीमती सीमा माने उपस्थित होत्या. डॉक्टर आणि परिचारिकांनी पालकांना नवजात बालकांचे योग्य संगोपन, स्वच्छता, नियमित लसीकरण आणि बालकांच्या सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद!
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला प्रसिद्ध जादूगार शिवम (शिवम मॅजिशियन) यांचा जादूचा प्रयोग! रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या लहान मुलांच्या मनोरंजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रयोगाचा चिमुकल्यांनी मनमुराद आनंद लुटला. आरोग्यविषयक मार्गदर्शनासोबतच मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा हा उपक्रम उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.
यावेळी बालकांचे आरोग्य, योग्य पोषण आणि सर्वांगीण विकास याबाबतही पालकांमध्ये जागृती करण्यात आली. मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता कोणतीही समस्या जाणवल्यास वेळेत वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालरोग विभागातील सर्व प्राध्यापक, निवासी डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. पालक आणि लहान मुलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात या उपक्रमाची सांगता झाली.
बालआरोग्याचा जागर, पालकांना मार्गदर्शन अन् चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची मेजवानी, अशा तिहेरी संगमामुळे बारामतीतील हा उपक्रम संस्मरणीय ठरला!






