बारामतीच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा! प्रा. सुजाता पाटील यांना अन्नप्रक्रिया व अभियांत्रिकी विषयात पीएच.डी.
फळांच्या सालींपासून मूल्यवर्धनाचा नवा प्रयोग!

बारामतीच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा! प्रा. सुजाता पाटील यांना अन्नप्रक्रिया व अभियांत्रिकी विषयात पीएच.डी.
फळांच्या सालींपासून मूल्यवर्धनाचा नवा प्रयोग!
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथील अन्न तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. सुजाता वैभव पाटील यांनी अन्नप्रक्रिया व अभियांत्रिकी विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. डी. वाय. पाटील ॲग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी, कोल्हापूर येथून त्यांनी ही पदवी प्राप्त केली.
प्रा. पाटील यांनी “Development of Fortified Millet Malt Premix Through Fruit Peel Waste Valorization” या विषयावर संशोधन केले. या संशोधनातून मिलेट्सच्या पौष्टिक व कार्यात्मक गुणधर्मांचा उपयोग करून पौष्टिक मिलेट माल्ट प्रीमिक्स विकसित करण्यासोबतच ड्रॅगन फ्रूट आणि केळीच्या सालींसारख्या कृषी-आधारित उपउत्पादनांचे मूल्यवर्धन करण्यावर भर देण्यात आला.
संशोधनामध्ये रागी आणि कोदो मिलेट माल्टमध्ये ड्रॅगन फ्रूट व केळीच्या सालींच्या पावडरींचा वापर करून विविध मिश्रणांचे परीक्षण करण्यात आले. विकसित उत्पादनाच्या पौष्टिक, भौतिक, रासायनिक, कार्यात्मक, अँटीऑक्सिडंट तसेच संवेदनात्मक गुणधर्मांचा सखोल अभ्यास करण्यात आला. यासोबतच उत्पादनाची साठवणक्षमता, गुणवत्ता आणि स्थिरता यांचेही मूल्यमापन करण्यात आले.
या संशोधनामुळे मिलेट्सचे मूल्यवर्धन करण्यासोबतच फळांच्या सालींचा अन्नोपयोगी पुनर्वापर आणि कृषी-आधारित उपउत्पादनांचे शाश्वत व्यवस्थापन यांना चालना मिळण्याची शक्यता आहे. संशोधनातून पौष्टिक, कार्यक्षम आणि ग्राहकांना स्वीकारार्ह असे मिलेट माल्ट प्रीमिक्स विकसित करण्यात यश आले.
या संशोधनासाठी डॉ. सागर चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. सुजाता वैभव पाटील यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य, अन्न तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक, कर्मचारी आणि सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.






