बारामतीतील माळावरच्या देवीचा रस्ता आठ महिन्यांपासून अर्धवट; नवरात्रापूर्वी काम पूर्ण करण्याची मागणी
धूळ, चिखल आणि खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास!

बारामतीतील माळावरच्या देवीचा रस्ता आठ महिन्यांपासून अर्धवट; नवरात्रापूर्वी काम पूर्ण करण्याची मागणी
धूळ, चिखल आणि खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास!
बारामती वार्तापत्र
बारामती शहर व परिसरातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या माळावरच्या देवीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम तब्बल आठ महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत असल्याने नागरिक आणि भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नवरात्र उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अद्याप रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसल्याने उत्सवाच्या काळात भाविकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
माळावरच्या देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची मोठी वर्दळ असते. नवरात्रोत्सवात ही गर्दी आणखी वाढते. अशा परिस्थितीत देवीकडे जाणारा प्रमुख मार्गच अर्धवट राहिल्याने वाहतूक कोंडी, धुळीचा त्रास, चिखल आणि अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
आठ महिन्यांपासून काम रखडलेच!
रस्त्याचे काम सुरू करण्यात आले; मात्र ते अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे या मार्गावरून दररोज ये-जा करणारे स्थानिक रहिवासी, वाहनचालक तसेच भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काम कधी पूर्ण होणार, याबाबत नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या कामाला तातडीने गती देऊन आवश्यक दुरुस्ती तसेच रस्त्याचे डांबरीकरण अथवा सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
‘नवरात्रापूर्वी रस्ता पूर्ण करा’
नवरात्रात माळावरच्या देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने त्यापूर्वी रस्ता पूर्णपणे सुस्थितीत करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. उत्सव सुरू झाल्यानंतर घाईघाईने काम करण्याऐवजी प्रशासनाने आताच यंत्रणा कामाला लावावी, अशी मागणीही होत आहे.
दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकाळात बारामतीतील विकासकामांना गती मिळत असल्याची भावना काही स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. त्यांच्या मते, अनेक कामे तातडीने मार्गी लावली जात होती; मात्र सध्या आठ महिन्यांपासून रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
प्रशासन आता तरी जागे होणार का?
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माळावरच्या देवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे रस्ता पूर्ण न झाल्यास त्याचा थेट फटका भाविक आणि स्थानिक नागरिकांना बसण्याची शक्यता आहे.
आता प्रशासन या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन नवरात्र सुरू होण्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करणार का? की भाविकांना यंदाही अर्धवट रस्त्यातूनच देवीच्या दर्शनासाठी जावे लागणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.






