बारामतीत ग्रामस्थ रस्त्यावर उतरले अन् वनविभागाची कारवाई; खांडजचा बिबट्या पिंजऱ्यात
ग्रामस्थ रस्त्यावर उतरले अन् वनविभाग हलले

बारामतीत ग्रामस्थ रस्त्यावर उतरले अन् वनविभागाची कारवाई; खांडजचा बिबट्या पिंजऱ्यात
ग्रामस्थ रस्त्यावर उतरले अन् वनविभाग हलले.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील खांडज गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याचा बंदोबस्त करून ग्रामस्थांना सुरक्षितता मिळावी, या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलनही केले होते.
ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत वनविभागाने परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावून आवश्यक उपाययोजना सुरू केल्या होत्या. अखेर खांडज गावातील बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचालींमुळे शेतकरी, महिला तसेच नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
बिबट्याच्या बंदोबस्तासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाची अखेर दखल घेतली गेल्याने ग्रामस्थांच्या लढ्याला यश मिळाले असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याबाबत वनविभागाकडून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. परिसरात आणखी बिबट्यांचा वावर आहे का, याचीही पाहणी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
खांडजकरांचा लढा यशस्वी; बिबट्या पिंजऱ्यात, गावकऱ्यांना दिलासा!






