आम्ही सांगत होतो कुणाच्या बोलण्यात येऊ नका,अजितदादांनी एसटी कर्मचाऱ्यांना आज पुन्हा सुनावलं
आधी म्हणायचं रस्ता करा आणि रस्ता झाला की म्हणतात स्पीडब्रेकर टाका

आम्ही सांगत होतो कुणाच्या बोलण्यात येऊ नका,अजितदादांनी एसटी कर्मचाऱ्यांना आज पुन्हा सुनावलं
आधी म्हणायचं रस्ता करा आणि रस्ता झाला की म्हणतात स्पीडब्रेकर टाका
बारामती वार्तापत्र
अजित पवार यांनी हिंसक आंदोलन करणाऱ्यांना एसटी कर्मचाऱ्यांना आज पुन्हा सुनावलं आहे. बारामती तालुक्यातील सुपे गावात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. एसटी कर्मचारी आपलेच आहेत. पण त्यांनी ऐकलं नाही, असं अजित पवार म्हणाले.
आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सांगत होतो, पण ऐकलंच नाही, असं अजितदादा म्हणाले.उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते बारामती तालुक्यातील सुपे गावात विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी अजित पवार बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही सांगत होतो कुणाच्या बोलण्यात येऊ नका. तुम्हाला ते अडचणी आणतील. चांगलं चाललं असताना काही लोक अडचणी निर्माण करतात. काही लोक भावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं अजितदादा म्हणाले.
‘बाबांनो… तुम्ही सगळे ड्रायव्हर, कंडक्टर आहात. आपले आहात. तुम्ही कारण नसताना कुणाच्यातरी चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका. त्यांच्या चुकीच्या सल्ल्याचा बळी पडू नका. ते तुम्हाला अडचणीत आणतील. कोर्टात प्रकरण गेलं. यासंदर्भात समिती नेमली गेली. विलिनीकरण करायचं की नाही? यासंदर्भात अहवालही आला. हे सगळं चित्र आपल्यासमोर स्पष्ट आहे. नीट काम सुरू असताना त्यात खोडा कसा घालता येईल, याचं काम काहीजण करतात. त्यात नवीन समस्या कशा निर्माण करता येतील. लोकांमध्ये गैरसमज कसे निर्माण करता येतील, लोकांच्या भावना कशा भडकवता येतील, अशा प्रकारचा प्रयत्न दुर्दैवाने काही ठिकाणी होतोय. जनतेला याचा अनुभव आला आहे,’ असं अजित पवार म्हणाले.