स्थानिक

बारामतीत वाढत्या लोडशेडिंगवरून नागरिक आक्रमक; युगेंद्र पवार यांनी महावितरण अधिकाऱ्याची घेतली भेट

वीज कपातीबाबत अधिकाऱ्यांसमोर तीव्र नाराजी व्यक्त

बारामतीत वाढत्या लोडशेडिंगवरून नागरिक आक्रमक; युगेंद्र पवार यांनी महावितरण अधिकाऱ्याची घेतली भेट

वीज कपातीबाबत अधिकाऱ्यांसमोर तीव्र नाराजी व्यक्त

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या लोडशेडिंगच्या समस्येमुळे नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. कडक उन्हाळा, वाढती वीज मागणी आणि वारंवार होणारी वीज कपात यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीच्या कामांनाही मोठा फटका बसत आहे.

या पार्श्वभूमीवर आज बारामतीतील भिगवण रोडवरील ‘ऊर्जा भवन’ येथे महावितरणच्या (MSEB) प्रमुख अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी तालुक्यातील विविध भागांत होत असलेल्या अनियमित वीज कपातीबाबत अधिकाऱ्यांसमोर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री मोटार सुरू करण्यासाठी जागरण करावे लागत असल्याने त्यांचे मोठे हाल होत आहेत.

तसेच नागरिकांनाही उष्णतेच्या तीव्रतेत सततच्या वीज खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले.

बैठकीदरम्यान वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी करण्यात आली. भारनियमनाचे वेळापत्रक निश्चित आणि पारदर्शक पद्धतीने जाहीर करणे, ग्रामीण भागातील तांत्रिक अडचणी त्वरित दूर करणे तसेच शेतीपंपांसाठी नियमित वीजपुरवठा उपलब्ध करून देणे, या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली.

महावितरण प्रशासनाने नागरिक आणि शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने घेतल्या असून, वाढत्या लोडशेडिंगवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच भविष्यात अशा समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी प्रशासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

या चर्चेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष ॲड. राजेंद्रबापू जगताप, महिला तालुकाध्यक्षा वनिताताई बनकर, बारामती नगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या आरतीताई शेंडगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी बांधव आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांनी लोडशेडिंगच्या प्रश्नावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी करत प्रशासनाकडे अपेक्षा व्यक्त केल्या.

Back to top button