स्थानिक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनंतर मोरगावला कायमस्वरूपी १०८ रुग्णवाहिका मंजूर

मोरगाव-नीरा हा महत्त्वाचा राज्य महामार्ग असल्याने या मार्गावर दरमहा सरासरी ८ ते १० अपघात घडत

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनंतर मोरगावला कायमस्वरूपी १०८ रुग्णवाहिका मंजूर

मोरगाव-नीरा हा महत्त्वाचा राज्य महामार्ग असल्याने या मार्गावर दरमहा सरासरी ८ ते १० अपघात घडत

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुक्यातील मोरगाव येथे आता कायमस्वरूपी १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनंतर या सेवेला मंजुरी देण्यात आली आहे. पुणे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत.

मोरगाव-नीरा हा महत्त्वाचा राज्य महामार्ग असल्याने या मार्गावर दरमहा सरासरी ८ ते १० अपघात घडत असतात. मात्र, परिसरात तातडीची रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे अपघातस्थळी पोहोचण्यास ३५ ते ४५ मिनिटांचा विलंब होत होता. त्यामुळे गंभीर जखमींना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होत होत्या.

आता मोरगाव येथेच १०८ रुग्णवाहिका कायमस्वरूपी उपलब्ध झाल्याने अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीची वैद्यकीय मदत मिळणार आहे. अपघातानंतरचा पहिला तास अत्यंत महत्त्वाचा मानला जात असल्याने या निर्णयामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मोठी मदत होणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

दरम्यान, या सेवेसाठी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी कदम (ढोले) तसेच मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे पत्राद्वारे मागणी केली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत आरोग्य विभागाला तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्यानंतर या प्रक्रियेला वेग मिळाला.

Back to top button