माळेगाव बु

बारामतीत ३,९०० चा ऊसदर! माळेगाव कारखान्याचा मोठा निर्णय; बळीराजा खूश!

राज्यातील महत्त्वाचा साखर पट्टा मानला जातो.

बारामतीत ३,९०० चा ऊसदर! माळेगाव कारखान्याचा मोठा निर्णय; बळीराजा खूश!

राज्यातील महत्त्वाचा साखर पट्टा मानला जातो.

बारामती वार्तापत्र 

राज्यभर गाजत असलेल्या ऊसदराच्या लढ्याला आता बारामतीतही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी प्रतिटन ३,९०० रुपयांची पहिली उचल जाहीर केल्यानंतर आता बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यानेही हाच दर जाहीर केला आहे. चालू गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३,९०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे बारामतीच्या साखर पट्ट्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील ऊसदराकडे शेतकऱ्यांचे विशेष लक्ष लागले होते. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील या कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत पहिली उचल प्रतिटन ३,९०० रुपये निश्चित करण्यात आली. या निर्णयामुळे ऊस उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोल्हापूर पॅटर्नचा बारामतीतही प्रभाव!
यंदाच्या हंगामात ऊसदराचा मुद्दा राज्यभर चर्चेत आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी ऊसाला प्रतिटन ३,९०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी आंदोलनाची भूमिका घेतली होती. कोल्हापूर जिल्ह्यातून ३,९०० रुपयांच्या पहिल्या उचलीचा पायंडा पडला. त्यानंतर सांगली, सातारा आणि फलटण परिसरातील काही कारखान्यांनीही ३,९०० ते ३,९११ रुपयांपर्यंत पहिली उचल जाहीर केली.

दुष्काळी परिस्थिती, वाढते रासायनिक खतांचे दर, कीटकनाशके, मजुरी आणि मशागतीचा खर्च यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. ऊस पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवावे लागत असल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळणे आवश्यक असल्याची मागणी सातत्याने होत होती.
बारामती हा राज्यातील महत्त्वाचा साखर पट्टा मानला जातो. त्यामुळे येथील कारखान्यांनीही शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करून समाधानकारक दर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत होती.

अखेर माळेगाव कारखान्याने प्रतिटन ३,९०० रुपयांची पहिली उचल जाहीर केल्याने ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. आता बारामती तालुक्यातील इतर साखर कारखाने कोणता दर जाहीर करतात, याकडे संपूर्ण साखर पट्ट्याचे लक्ष लागले आहे.

Back to top button