बारामती नगरपरिषदेकडून तिस-या टप्प्यातील कोरोना सर्वेक्षणास प्रारंभ
कोरोना रूग्णांची जास्त संख्या असणा-या 11 प्रभागांचे पहिल्या 3 दिवसात तर उर्वरित प्रभागांचे पुढील 3 दिवसात घरोघरी जाऊन ऑक्सिमीटर व थर्मलगनच्या मदतीने सर्वेक्षण केले जाणार आहे

बारामती नगरपरिषदेकडून तिस-या टप्प्यातील कोरोना सर्वेक्षणास प्रारंभ
कोरोना रूग्णांची जास्त संख्या असणा-या 11 प्रभागांचे पहिल्या 3 दिवसात तर उर्वरित प्रभागांचे पुढील 3 दिवसात घरोघरी जाऊन ऑक्सिमीटर व थर्मलगनच्या मदतीने सर्वेक्षण केले जाणार आहे
बारामती वार्तापत्र
बारामतीमधील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चिंता व्यक्त करून प्रशासनाला कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणेबाबत निर्देश केले आहेत. त्यास अनुसरून आज नगरपरिषदेमध्ये कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या प्रभावी अंमलबजावणीव्दारे कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्ती शोधून त्यांची तपासणी संख्या वाढविणे, प्रतिबंधित क्षेत्रामध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे निर्जंतुकीकरण करणे व शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी कोविड लस घ्यावी याकरिता जनजागृती करणे आदी उपाययोजना तातडीने करण्याचे या चर्चेमध्ये निश्चित करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव , नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शहरामध्ये दिनांक 19 मार्च 2021 पासून सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याकरीता 450 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून एका पथकामध्ये 2 कर्मचारी याप्रमाणे 225 पथके तयार करण्यात आली आहेत. शहरातील 19 प्रभागांचे सर्वेक्षण आठवड्याभरात पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक प्रभागाकरीता दररोज 30 पथकांमार्फत सर्वेक्षणाचे काम केले जाणार आहे. या प्रत्येक पथकांसोबत मदतीकरीता 1 स्वयंसेवक देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोरोना रूग्णांची जास्त संख्या असणा-या 11 प्रभागांचे पहिल्या 3 दिवसात तर उर्वरित प्रभागांचे पुढील 3 दिवसात घरोघरी जाऊन ऑक्सिमीटर व थर्मलगनच्या मदतीने सर्वेक्षण केले जाणार आहे. त्याचप्रमाणे कसबा येथील नगरपरिषद शाळा क्रमांक 2 व सांस्कृतिक केंद्र या दोन ठिकाणी स्वॅब कलेक्शन सेंटर चालू करण्यात येणार असून त्याचठिकाणी कोरोनाची गंभीर लक्षणे आढळून येणा-या रुग्णास तातडीने दवाखान्यात दाखल करण्यासाठी रूग्णवाहिका देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करीता देखील 16 आशासेविकांचे स्वतंत्र पथक तयार केले असून त्यांच्या मदतीने कोरोनाबाधित रूग्णांच्या संर्पकातील जास्तीत जास्त व्यक्ती शोधून त्यांची तपासणी संख्या वाढविण्याचे व कोरोना प्रसार रोखण्याचे नियोजन केले आहे.
उपनगराध्यक्ष अभिजित जाधव यांनी सर्व नगरसेवकांना पत्र पाठवून आपआपल्या प्रभागातील 60 वर्षावरील व कोमार्बिड व्यक्तींनी न घाबरता कोविड लसीकरण करून घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याची जबाबदारी प्रत्येक नगरसेवकांनी स्विकारावी असे आवाहन केले आहे.
सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची शहरातील सर्व नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. कोरोनाबाधित रूग्णांनी गृहविलिनीकरण ऐवजी रूग्णालयात किंवा कोविड केअर सेंटर मध्ये दाखल व्हावे, सर्वांनी सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करावा, कोणत्याही प्रकारचा हजगर्जीपणा करू नये, असे आवाहन नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी केले आहे.
000000