बारामती नगरपरिषदेत नवीन कंत्राटाची प्रक्रिया; ‘कामगारांना कमी करू नका’—जनशक्ती संघाचे निवेदन
‘नवीन ठेक्यात आम्हाला कमी करू नका!’

बारामती नगरपरिषदेत नवीन कंत्राटाची प्रक्रिया; ‘कामगारांना कमी करू नका’—जनशक्ती संघाचे निवेदन
‘नवीन ठेक्यात आम्हाला कमी करू नका!’
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषदेच्या नवीन कंत्राट प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. ना. सुनेत्रावहिनी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष किरण इंगळे तसेच बारामती नगरपरिषद स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांना निवेदन देण्यात आले.
नवीन ठेक्यामध्ये सध्या कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना कायम ठेवावे आणि कोणत्याही कामगाराला कमी करू नये, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर नियमानुसार किमान वेतन, पीएफ, ESIS, बोनस आणि साप्ताहिक सुट्टी मिळावी, अशी मागणी करण्यात आली.
पीएफ-ESISची चौकशी करण्याची मागणी
मागील ठेकेदारांनी कामगारांच्या पीएफ व ESISची रक्कम नियमानुसार भरली आहे की नाही, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. चौकशीदरम्यान संबंधित कामगारांचे म्हणणे ऐकून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदारांची सुरक्षा अनामत रक्कम परत देऊ नये आणि दोष आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
स्थानिक ठेकेदारांना संधी, कामगारांच्या सुरक्षेवर भर
बारामतीतील स्थानिक ठेकेदारांना ठेका मिळण्यासाठी आवश्यकतेनुसार नियम व अटी शिथिल कराव्यात. कंत्राटी कामगारांची दर तीन महिन्यांनी आरोग्य तपासणी करावी तसेच कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी करण्यात आली.
कामावर असताना वाहनाचा अपघात झाल्यास त्याचा खर्च कामगारांच्या वेतनातून कपात न करता संबंधित ठेकेदाराने करावा. प्रत्येक कामगाराला पेमेंट स्लिप देण्यात यावी आणि वेतन प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेपर्यंत अदा करावे, अशी मागणी संघटनेने केली.
कामगाराला सेवेतून कमी करताना नियमानुसार नोटिसा देण्यात याव्यात. कामाच्या कालावधीत अपघात झाल्यास वैद्यकीय खर्च ठेकेदाराने करावा तसेच उपचार व रजेच्या कालावधीतील वेतनाबाबत नियमानुसार कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली.
कामगारांच्या हक्कांशी संबंधित या मागण्यांची तातडीने दखल घेऊन नवीन कंत्राट प्रक्रियेत कामगारांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव रणधीर अहिवळे, बारामती शहर अध्यक्ष आकाश शिंदे, उपाध्यक्ष विशाल जगताप, कार्याध्यक्ष निखिल सरोदे, सहकार्याध्यक्ष अनिकेत धालपे, सरचिटणीस सुरज वाडेकर, महिला अध्यक्ष संगीता खरात, महिला उपाध्यक्ष प्रतिभा वाघमारे, महिला कार्याध्यक्ष रुपाली वाडेकर, महिला संघटक अलका बगाडे, महिला सरचिटणीस अनिता पवार, महिला सहकार्याध्यक्ष सुजाता साबळे, महिला सहसंघटक सुमन अहिवळे, तसेच स्वप्निल लोंढे, शंकर शिंदे, रोहित कांबळे, नाना बगाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार उपस्थित होते.






