विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी बारामती पोलिसांची धडक मोहीम; अल्पवयीन वाहनचालकांवर १३ कारवाया
३ तासांत ७८ केसेस, ₹५९ हजार दंड

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी बारामती पोलिसांची धडक मोहीम; अल्पवयीन वाहनचालकांवर १३ कारवाया
३ तासांत ७८ केसेस, ₹५९ हजार दंड
बारामती वार्तापत्र
महाविद्यालयीन परिसरात बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना बारामती वाहतूक शाखेने चांगलाच दणका दिला आहे. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी (४ सप्टेंबर) सकाळी अचानक नाकाबंदी करत तब्बल ७८ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ₹५९ हजारांचा दंड ठोठावण्यात आला.
महाविद्यालयीन विद्यार्थिनींना सुरक्षित व निर्भय वातावरण मिळावे, छेडछाडीच्या प्रकारांना आळा बसावा तसेच कॉलेज परिसरात वेगाने, बेदरकारपणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
मा. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ही धडक कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत वाहतूक शाखेचे १९ पोलीस अंमलदार आणि १ आर.सी.पी. पथक सहभागी झाले होते. बारामती शहर पोलीस ठाण्याच्या मदतीने नाकाबंदी प्रभावीपणे राबविण्यात आली.
📌 कोणत्या नियमभंगावर किती कारवाई?
- लायसन्स जवळ नसणे – ३६ केसेस – ₹२०,०००
- नंबर प्लेट ब्रोकन – २१ केसेस – ₹१३,०००
- लायसन्स नसणे – २ केसेस – ₹१०,०००
- काळी काच – ३ केसेस – ₹३,५००
- नो पार्किंग – ३ केसेस – ₹२,५००
- पोलीस इशारा – १ केस – ₹१,५००
- ट्रिपल सीट – १ केस – ₹१,०००
- मोबाईलवर बोलत वाहन चालविणे – १ केस – ₹१,०००
- वाहनात बदल करणे – १ केस – ₹१,०००
- विदाउट HSRP – १ केस – ₹५००
- इतर – ८ केसेस – ₹५,०००
याशिवाय हेल्मेट, सीटबेल्ट, इन्शुरन्स, नो एन्ट्री, अवैध प्रवासी वाहतूक तसेच मोटार वाहन कायदा कलम १८५ आदी नियमभंगांचीही तपासणी करण्यात आली.
⚠️ अल्पवयीनांच्या वाहनचालकांवरही कारवाई
या कारवाईतील विशेष बाब म्हणजे अल्पवयीन मुले-मुली वाहन चालवत असल्याप्रकरणी १३ स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे त्यांच्या तसेच इतर नागरिकांच्या जीवितासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
👮♂️ विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला प्राधान्य
कॉलेज सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत विनाकारण वाहने फिरविणे, विद्यार्थिनींचा पाठलाग करणे, छेडछाडीला कारणीभूत ठरणारे वर्तन, मोठ्या आवाजात किंवा बेदरकारपणे वाहन चालविणे, ट्रिपल सीट प्रवास तसेच कॉलेज गेटसमोर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर यापुढेही पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
“महाविद्यालयात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला सुरक्षित वाटले पाहिजे. नियम पाळणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना बेदरकार वाहनचालकांमुळे त्रास होता कामा नये,” अशी भूमिका उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी व्यक्त केली.
महाविद्यालये, शाळा, प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील परिसरात पूर्वसूचना न देता अचानक नाकाबंदी करण्यात येणार असून नियम मोडणाऱ्यांवर कायद्यानुसार सक्त कारवाई केली जाणार आहे.






