माणुसकीला काळीमा! जमीन विकल्याच्या रागातून मुलांकडून आई-वडिलांना बेदम मारहाण
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल

माणुसकीला काळीमा! जमीन विकल्याच्या रागातून मुलांकडून आई-वडिलांना बेदम मारहाण
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल
इंदापूर | प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. आईच्या नावावर असलेली जमीन का विकली? या कारणावरून पोटच्या दोन मुलांनीच आपल्या ६५ वर्षीय वृद्ध वडिलांसह आजारी आईला भररस्त्यात अडवून लाकडी काठ्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास तुकाराम किसन राऊत (वय ६५) आणि त्यांची आजारी पत्नी अंजना राऊत हे गावात फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले होते. याचदरम्यान त्यांची दोन्ही मुले संजय राऊत आणि राजेंद्र राऊत यांनी गाडीने त्यांचा पाठलाग केला.
‘जमीन का विकली?’ म्हणत रस्त्यात अडवले
रस्त्यात गाडी थांबवून दोन्ही मुलांनी वडिलांना ‘जमीन का विकली?’ असा सवाल करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जमिनीचा व्यवहार तातडीने रद्द केला नाही, तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
यानंतर दोन्ही मुलांनी हातातील लाकडी काठ्यांनी वृद्ध आई-वडिलांवर हल्ला केला. या मारहाणीत तुकाराम राऊत यांच्या पाठीवर, चेहऱ्यावर, मांडीवर आणि डाव्या खांद्यावर दुखापत झाली. तर मध्ये पडलेल्या अंजना राऊत यांच्या उजव्या मनगटावर आणि कमरेवर काठीने मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे.
‘जमीन परत घ्या, नाहीतर…’
मारहाणीदरम्यान विकलेली जमीन तातडीने परत घ्या, अन्यथा गंभीर परिणाम होतील, अशा स्वरूपाची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. भररस्त्यात वृद्ध दांपत्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली.
नागरिक धावले; पोलिसांकडून कारवाई
हा प्रकार पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने हस्तक्षेप करत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमी दांपत्याला इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
तुकाराम राऊत यांच्या तक्रारीवरून संजय राऊत आणि राजेंद्र राऊत यांच्याविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोकादायक शस्त्राने मारहाण, शांततेचा भंग आणि जीवे मारण्याची धमकी यासंदर्भातील तरतुदींनुसार पुढील तपास सुरू आहे.
वृद्ध आई-वडिलांवरच पोटच्या मुलांनी केलेल्या या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.






