स्थानिक

बारामती परिमंडलाचे १३ दिवसांत २०४ कोटी वसुलीचे महावितरणचे ‘टार्गेट’

चालू महिन्याची मागणी २५७.५३ कोटी

बारामती परिमंडलाचे १३ दिवसांत २०४ कोटी वसुलीचे महावितरणचे ‘टार्गेट’

चालू महिन्याची मागणी २५७.५३ कोटी

बारामती वार्तापत्र

आर्थिक वर्ष संपण्यास अवघे १३ दिवस उरले असून, या तेरा दिवसांत २०४ कोटी रुपये वसुलीचे टार्गेट महावितरणने ठेवले आहे. प्रत्येक अभियंता, लाईनमन यांना हे उद्दिष्ट (टार्गेट) विभागून देण्यात आले असून, वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिल तातडीने भरुन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी केले आहे.

ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी महावितरण कायम प्रयत्नशील असते. अखंडित वीज पुरविणे जशी महावितरणची जबाबदारी आहे. तसे वापरलेल्या विजेचे बिल वेळत भरणे ही ग्राहकांची देखील जबाबदारी आहे. परंतु, काही ग्राहक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे महावितरणला वीजबिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई करावी लागते.

बारामती परिमंडलात लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहकांकडे सुमारे ११२ कोटींची थकबाकी आहे. तर चालू महिन्याची मागणी २५७.५३ कोटी असे मिळून मार्च महिन्यात बारामती परिमंडलास ३६९.४६ कोटी वसुलीचे उद्दिष्ट सांघिक कार्यालयाकडून देण्यात आले आहे.

१८ दिवसांत केवळ १६६ कोटी रुपये वसूल झाले असून हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ४४.९३ टक्के इतकेच आहे. त्यामुळे उरलेल्या १३ दिवसांत वसुलीचा वेग वाढवावा लागणार असून, कोणत्याही परिस्थितीत २०४ कोटी रुपये वसुलीचे लक्ष गाठणार असल्याचे श्री. पेठकर यांनी सांगितले. त्यासाठी दैनंदिन वसुलीवर लक्ष ठेवण्यासाठी विभागनिहाय पथके सुद्धा तयार केली आहेत.

रोहित्राची थकबाकी शून्य करावी- पेठकर

रोहित्रांची जबाबदारी वीज कर्मचाऱ्यांना नेमून दिलेली असते. परिमंडलातील सर्व वीज कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अखत्यारित रोहित्रावरील सर्व ग्राहकांचे वीजबिल वसूल करुन थकबाकी शून्य करावी,असे निर्देश सर्वांना दिले असल्याचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी सांगितले.

वीजबिल भरण्यासाठी …

ग्राहकांना वीजबिल भरता यावे याकरिता सुट्टींच्या दिवशी अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे सुरु ठेवण्यात आली आहेत. याशिवाय रांगा टाळून महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर व महावितरण मोबाईल ॲपद्वारेही सहज व घरबसल्या कोठूनही वीजबिल भरता येते. वीजबिलावरील क्यूआर कोड स्कॅनकरुन कोणत्याही युपीआय ॲपद्वारे वीजबिल भरणे शक्य आहे. ऑनलाइन वीजबिल भरल्यास वीजबिलामध्ये ०.२५ टक्के आणि पहिल्या सात दिवसांत (Prompt Payment) बिल भरल्यास १ टक्का असे एकूण १.२५ टक्के सूट मिळते. क्रेडिट कार्ड वगळता इतर पर्यांयाद्वारे ऑनलाइनद्वारे होणारा वीजबिल भरणा नि:शुल्क आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!