स्थानिक

बारामती–फलटण रस्त्यावरील जीवघेणा धोका वीजतारेच्या धक्क्याने कुत्रा, मेंढीचा मृत्यू, बाप-लेक थोडक्यात बचाव

वीजकेबल रस्त्यालगत धोकादायक स्थितीत

बारामती–फलटण रस्त्यावरील जीवघेणा धोका
वीजतारेच्या धक्क्याने कुत्रा, मेंढीचा मृत्यू, बाप-लेक थोडक्यात बचाव

वीजकेबल रस्त्यालगत धोकादायक स्थितीत

बारामती वार्तापत्र 

बारामती–फलटण रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या वीजवाहिन्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अधिग्रहित झालेली काही घरे अद्याप हटविण्यात आलेली नसल्याने वीजवाहिनीचे भूमिगत (अंडरग्राऊंड) काम रखडले आहे. परिणामी, सुमारे वर्षभरापूर्वी करण्यात आलेले वीजवाहिन्यांचे लाईन शिफ्टिंग आजही तात्पुरत्याच स्वरूपात असून, त्याचे गंभीर परिणाम आता समोर येऊ लागले आहेत.

रस्त्याचे काम सुरू असताना जेसीबी किंवा इतर अवजड वाहनाचा धक्का वीजवाहिनीला लागल्याने केबल मधील तार उघडी झाली आणि त्यामध्ये करंट प्रवाहित झाला. या घटनेत एका कुत्र्याचा आणि एका मेंढीचा जागीच मृत्यू झाला. याच वेळी त्या ठिकाणी असलेले बाप-लेक थोडक्यात बचावल्याने मोठी जीवितहानी टळली. काही क्षणांचा फरक पडला असता मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्ता रुंदीकरणासाठी अनेक मालमत्ता अधिग्रहित करण्यात आल्या असल्या तरी काही घरे अद्याप पाडण्यात आलेली नाहीत. त्यामुळे वीजवाहिनी कायमस्वरूपी भूमिगत करता आलेली नाही. तात्पुरत्या स्वरूपात हलविण्यात आलेल्या या वीजकेबल रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असल्याने बांधकाम यंत्रणा, वाहनचालक आणि पादचारी यांच्यासाठी सततचा धोका निर्माण झाला आहे.
रोज मोठ्या प्रमाणावर जेसीबी, डंपर आणि अन्य अवजड वाहने या मार्गावरून ये-जा करत असल्याने वीजवाहिन्यांना धक्का लागण्याचा धोका कायम आहे. यापूर्वीही या भागात केबल तुटणे ठिणग्या उडणे, केबल खाली येणे अशा घटना घडल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने वीजपुरवठा खंडित करून सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच अधिग्रहित घरे तातडीने हटवून वीजवाहिनीचे भूमिगत काम पूर्ण करावे, अन्यथा एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
—–
‘अपघात नव्हे, प्रशासनाच्या विलंबाचा परिणाम?’

* अधिग्रहित घरे हटविण्याचे काम रखडले.
* वर्षभरापासून तात्पुरती वीजलाइन कायम.
* भूमिगत वीजवाहिनीचे काम थांबले.
* जेसीबीच्या धक्क्याने वीजवाहिनी धोकादायक ठरली.
* कुत्रा व मेंढीचा करंट लागून मृत्यू.
* बाप-लेक थोडक्यात बचावले.
* नागरिकांकडून तातडीने कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी.

Back to top button