फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कानपिचक्या
स्पष्टवक्ते आणि रोखठोक स्वभाव

फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कानपिचक्या
स्पष्टवक्ते आणि रोखठोक स्वभाव
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता संबंधितांना जागेवर खडसावणं ही अजित पवारांची पद्धत अनेकदा पहायला मिळालीय. बारामतीत अजित पवारांनी फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. काम करणारे पुढे या, मिरवणाऱ्यांनी बाजूला व्हा असं म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना टोला लगावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आठवड्यातून एक दिवस बारामतीत येत असतात. या दरम्यान, विकासकामांची पाहणी, कोरोना आढावा बैठक असा त्यांचा दिनक्रम असतो. त्याचबरोबर कोरोना आणि नुकत्याच झालेल्या पूरग्रस्त मदत आणि साहित्याचं वाटप अजित पवार यांच्या हस्ते होत असतं. विद्या प्रतिष्ठान संकुलाच्या परिसरात विविध संस्थांच्या वतीने आयोजित समाजोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी अजित पवार यांनी फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.
बारामतीतील अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत पाठवण्यात आली. यावेळी अजित पवार यांनी मिरवणारे बाजूला व्हा, ज्यांनी काम केलंय, त्यांना पुढे येऊ द्या अशा शब्दात कानपिचक्या दिल्या. तर बाजूलाच स्व. तुकाराम भापकर प्रतिष्ठानकडून 5 टँकर देण्यात आले. त्यावेळीही अजित पवारांनी ज्यांनी काम केलंय त्यांनी फोटोसाठी उभे रहा आणि बाकीचे बाजूला व्हा असं आपल्या खास शैलीत सांगत समाजोपयोगी काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं.
स्पष्टवक्ते आणि रोखठोक स्वभाव असलेले अजित पवार नेहमीच आपल्या स्टाईलमुळे चर्चेत असतात. त्यांनी फोटोसाठी पुढे पुढे येणाऱ्यांना त्यांच्या स्टाईलमध्ये कानपिचक्या दिल्या. त्यामुळं फोटोसाठी नाहक पुढे पुढे करणाऱ्यांना चांगलाच चाप बसलाय हे मात्र नक्की.