मातृभाषेचा अभिमान जपा मुलींवरचा खर्च हा खर्च नव्हे, ‘भविष्याची गुंतवणूक’ — सुधा मूर्ती
कर्नाटकात विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणावर सायकली दिल्या जातात

मातृभाषेचा अभिमान जपा
मुलींवरचा खर्च हा खर्च नव्हे, ‘भविष्याची गुंतवणूक’ — सुधा मूर्ती
कर्नाटकात विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणावर सायकली दिल्या जातात
बारामती वार्तापत्र
मातृभाषा ही आईसारखी असते. कितीही मोठे झालात, कितीही भाषा शिकलात तरी आपल्या मातृभाषेला कधीही विसरू नका. इंग्रजी शिकणे काळाची गरज आहे, पण मातृभाषेचा अभिमान प्रत्येकाने जपला पाहिजे.
महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास प्रत्येकाला माहीत असला पाहिजे आणि मराठीचा अभिमानही मनात असला पाहिजे, असे प्रतिपादन पद्मभूषण खासदार सुधा मूर्ती यांनी बारामती येथे ग. दि. मा. सभागृह केले.
बारामतीत आयोजित ‘टू व्हील्स ऑफ होप – सायकल बँक’ उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, खासदार स्वाती मालीवाल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ‘टू व्हील्स ऑफ होप’ मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत सायकली पोहोचवण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला. पहिल्या टप्प्यात प्रतीकात्मक स्वरूपात दोन हजार विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले.
याच कार्यक्रमात पुणे जिल्हा परिषदेच्या २४० हून अधिक शाळांमध्ये डिजिटल वर्गखोल्या, ८० हून अधिक शाळांमध्ये स्टेम प्रयोगशाळा आणि १० शाळांमध्ये पी लॅब सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पाही पार पडला.
सुधा मूर्ती पुढे म्हणाल्या, मुलींच्या शिक्षणासाठी केलेला खर्च हा खर्च नसून भविष्याची गुंतवणूक आहे. कर्नाटकात विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणावर सायकली दिल्या जातात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही सर्व मुलींना मोफत सायकली मिळाल्या पाहिजेत. शिक्षणासाठी त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा देणे ही समाजाची जबाबदारी आहे.
पालकांना उद्देशून त्या म्हणाल्या, मुलांनी मागितलेली प्रत्येक गोष्ट लगेच देऊ नका. योग्य वेळी नाही म्हणायला शिका. त्यामुळे मुलांमध्ये संयम, कष्टाची जाणीव आणि जबाबदारीची भावना विकसित होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी वाचन-लेखनाचे महत्त्व अधोरेखित केले. मुलांना पाहिलेले, अनुभवलेलं लिहिण्याची सवय लावा. लेखनातून विचार समृद्ध होतात आणि त्यातूनच उत्तम लेखक घडतात. त्याचे उदाहरण मी स्वतः आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित लेखन करण्याचा सल्ला दिला.
शिक्षक आणि पालक जे सांगतात ते टाळू नका. त्यांच्या मार्गदर्शनाचा स्वीकार केल्यास आयुष्यात यशाचा मार्ग अधिक सुकर होतो, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.
बारामतीच्या विकासाचाही उल्लेख करताना सुधा मूर्ती म्हणाल्या, बारामतीत येताना येथील रस्ते आणि विकासकामे पाहून आनंद झाला. नियोजनबद्ध विकासामुळे हा परिसर वेगळा भासतो.
————-
सायकल म्हणजे महिलांच्या स्वातंत्र्याचे प्रतीक
सायकल ही केवळ दोन चाकांची वाहतूक व्यवस्था नसून, ती महिलांसाठी स्वातंत्र्य, आत्मविश्वास आणि स्वयंपूर्णतेचे प्रतीक आहे. ग्रामीण असो वा शहरी भाग, सायकलमुळे महिलांचा प्रवास अधिक सोयीचा होतो, वेळेची बचत होते आणि शिक्षण, रोजगार तसेच इतर संधींपर्यंत त्यांची सहज पोहोच निर्माण होते. महिलांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी पुढे यावे. बाल लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना कठोर फाशी शिक्षा हवी असे प्रतिपादन खासदार स्वाती मालीवाल यांनी केले.
———-






