माळेगाव बु

माळेगाव साखर कारखान्याच्या कामकाजात शेखर गायकवाड यांची एंट्री सुनेत्रा पवारांचा महत्त्वाचा निर्णय

निवृत्त साखर आयुक्तांकडे मार्गदर्शनाची जबाबदारी; कारखान्याच्या पारदर्शक व कार्यक्षम व्यवस्थापनावर भर

माळेगाव साखर कारखान्याच्या कामकाजात शेखर गायकवाड यांची एंट्री सुनेत्रा पवारांचा महत्त्वाचा निर्णय

निवृत्त साखर आयुक्तांकडे मार्गदर्शनाची जबाबदारी; कारखान्याच्या पारदर्शक व कार्यक्षम व्यवस्थापनावर भर

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजात प्रथमच एका माजी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याचा सहभाग निश्चित झाला आहे. कारखान्याच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत निवृत्त साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे कारखान्याच्या कामकाजासाठी मार्गदर्शनाची जबाबदारी सोपविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने घेण्यात आला.

कारखान्याच्या प्रशासनात अधिक पारदर्शकता, कार्यक्षम व्यवस्थापन आणि सर्वांगीण प्रगती साधण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. साखर उद्योगातील शेखर गायकवाड यांचा प्रदीर्घ अनुभव माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, कारखान्याची कार्यपद्धती अधिक सक्षम व पारदर्शक करण्याबरोबरच सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळावा, हा या निर्णयामागील प्रमुख हेतू आहे.

दरम्यान, कारखान्याने ऊस लागवडीला चालना देण्यासाठी आणि शेतीपूरक उपक्रमांना बळकटी देण्यासाठी सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन २०० रुपयांचे कांडे पेमेंट जमा केले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक सभासदांनी अध्यक्षा सुनेत्रा पवार, उपाध्यक्षा संगीता कोकरे आणि संचालक मंडळाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

बैठकीला उपाध्यक्षा संगीता कोकरे, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, तानाजी कोकरे, योगेश जगताप यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते. तसेच माजी सभापती अविनाश गोफणे, संजय जगताप, शेतकरी संघटनेचे सुखदेव जाधव, सदाशिव ढवळे, माऊली कदम, फरतडे आदी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या शेतकरीहिताच्या निर्णयांचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.

अनुभवी प्रशासकीय नेतृत्वाचा लाभ आणि शेतकरीकेंद्रित निर्णयांचा संगम साधत माळेगाव सहकारी साखर कारखाना कार्यपद्धतीत नवे बदल घडवून आणण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

Back to top button